धुळय़ात भाजपच्या डॉ. सुभाष भामरेंनी राखला गड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, धुळे

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचा दणदणीत पराभव केला. डॉ. भामरे यांना सुमारे साडेपाच लाख मते मिळाली, तर कुणाल पाटील यांना चार लाखांच्या आतच समाधान मानावे लागले, तर अनिल गोटे यांना दहा हजारांपर्यंतही मजल मारता आलेली नाही. गेल्या सरकारमध्ये डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या विजयामुळे डॉ. भामरे यांनी आपला गड कायम राखला आहे.

धुळे शहरातील नगावबारीजवळील शासकीय गोदामात गुरुवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. प्रारंभी टपालातून आलेल्या मतांची मोजणी झाली. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतांची मोजणी सुरू झाली. डॉ. सुभाष भामरे यांनी 13 हजार मतांनी आघाडी घेतली. बाजार समितीजवळील डॉ. भामरे यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. कार्यकाळ संपत असलेल्या केंद्र सरकारमध्ये डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मोदी यांच्या नेतृत्वात नव्याने स्थापन होणाऱ्या केंद्र सरकारमध्ये डॉ. भामरे यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार का, याकडे आता त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.