जेलमधील वस्तू मिळणार ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन ,मुंबई

सध्या ऑनलाइन पोर्टलवर जीवनावश्यक ते विविध ब्रॅण्डच्या चैनीच्या वस्तू सहज उपलब्ध होतात. आता तुरुंगात कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन पोर्टलवर लवकरच उपलब्ध होणार आहेत. ‘महाराष्ट्र प्रिझन ब्रॅण्ड’ या नावाने वस्तू ऑनलाइन विक्रीकरिता ठेवल्या जाणार आहेत. त्याकरिता एक संकेतस्थळ सुरू केले जाईल.

कैद्यांना विविध कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जाते. कारागृहात निर्माण केल्या जाणाऱया वस्तूंना प्रचंड मागणी असते, मात्र त्याची फारशी जाहिरात केली जात नाही. कारागृहात तयार केलेल्या वस्तू ऑनलाइन विक्री करण्यास तुरुंग प्रशासन इच्छुक आहे. दक्षिण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांनी तुरुंगात निर्माण होणाऱया वस्तूंबाबत नुकताच आढावा घेतला. तुरुंगात फर्निचर, बेडस्, खुर्च्यांसारख्या वस्तू निर्माण केल्या जातात. या वस्तू ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या पोर्टलवर विक्रीकरिता ठेवल्यास त्याची सहज विक्री होईल. विक्रीतून मिळणारे पैसे हे कैद्यांना मिळतील. अधिकाधिक महसूल मिळवण्याकरिता तुरुंगात निर्माण केलेल्या वस्तू ऑनलाइन पोर्टलवर ठेवल्या जातील. ज्या कैद्यांना नातेवाईक नाहीत त्यांना हाताशी दोन पैसे राहतील असा यामागील आशावाद आहे.

ठाणे जेलमधील केकला डिसेंबरमध्ये प्रचंड मागणी असते. संभाजीनगर येथील खुल्या कारागृहात गुळाची निर्मिती सुरू झाली आहे. नाशिकच्या तुरुंगात कैद्यांनी गणेशमूर्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला आहे.

तुरुंगातील वस्तू ऑनलाइन विक्रीकरिता ठेवल्या जाणार आहेत. ‘महाराष्ट्र प्रिझन ब्रँड’ या या नावाने वस्तूंची विक्री होईल. तसेच काही शोरूमसोबत टायअप करून तुरुंगातील वस्तू विक्रीचा विचार आहे.