सामना ऑनलाइन , मुंबई
कुठल्याही जाहिरातींच्या अडथळय़ाविना व्हॉटस्ऍपवर चॅटिंगचा आनंद घेणाऱया युजर्सना आता जाहिरातींचा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण पुढील वर्षापासून व्हॉटस्ऍपवर जाहिराती दिसणार असल्याची माहिती आहे.
जगभरात व्हॉटस्ऍपचे लाखो युजर्स आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकने व्हॉटस्ऍप कंपनी विकत घेतल्यानंतर व्हॉटस्ऍपवर चॅटिंगसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची चर्चा होती. मात्र आता व्हॉटस्ऍपसाठी पैसे मोजावे लागणार नसले तरी जाहिरातींचा त्रास मात्र युजर्सना सहन करावा लागणार आहे.
2020 मध्ये व्हॉटस्ऍपवर जाहिराती सुरू होणार असल्याची माहिती आहे. स्टेटस स्टोरीजमध्ये या जाहिराती दिसणार असून चॅटिंग करताना युजर्सना कोणताही त्रास सहन करावा लागणार नसल्याचे बोलले जातेय. त्यामुळे इतरांच्या स्टेटस स्टोरी पाहताना जाहिरातींचा सामना युजर्सना करावा लागू शकतो.



























































