गावातील स्वस्त धान्य दुकानाची तक्रार केली म्हणून घरात घुसून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

गावातील स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वाटप करत नाही अशी तक्रार केल्याने एकास घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदपूर तालूक्यातील मांगदरी येथे घडली. याप्रकरणी चारजणांविरुध्द अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तुळशीदास मारोती देवकते यांनी तक्रार दाखल केली. मौजे मांगदरी गावातील स्वस्त धान्य दुकान रघुनाथ किशन चौथरे हा चालवतो. तो धान्य वेळेवर देत नसल्याच्या कारणावरुन गावातील 50 लोकांनी त्याच्या विरुध्द अहमदपूर तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याचप्रमाणे अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तहसीलदार यांच्या कार्यालयात जाण्यासाठी सर्व जण जमले असताना रघुनाथ किशन चौथरे, सत्यवान चौथरे ,समाधान चौथरे , विमलबाई चौथरे हे चौघे फिर्यादीच्या घरी आले. तू स्वतःला मोठा पुढारी समजतो का म्हणून शिविगाळ केली. रघूनाथ चौथरे याने हातातील दगडाने मारुन फिर्यादीचे नाक फोडले. फिर्यादीची आई सोडवण्यास आली तर त्यांनाही मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, मणी हरवले . फिर्यादीच्या पत्नीसही मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अ‍ॅक्ट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी अहमदपूर पोलिसांनी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.