
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये झटका बसलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपकडून एकामागोमाग एक राजकीय हादरे बसत आहेत. बुधवारी आणखी एका आमदाराने व तीन नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले. तृणमूलचे आमदार मनीरूल इस्लाम यांनी नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मनीरूल इस्लाम यांच्यासह गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इक्बाल आणि निमाई दास या नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.
Trinamool Congress MLA Manirul Islam joins Bharatiya Janata Party in Delhi. TMC’s Gadadhar Hazra, Mohd Asif Iqbal and Nimai Das also join BJP. pic.twitter.com/Y2rOILuZ2f
— ANI (@ANI) May 29, 2019
याआधी मंगळवारी भाजपने तृणमूल काँग्रेसला पुन्हा हादरा दिला. तृणमूलचे आमदार सुभ्रांशू रॉय, तुषारक्रांती भट्टाचार्य आणि माकपचे आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुभ्रांशू हे भाजप नेते मुकुल रॉय यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी मुकुल रॉय यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच 50 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजप मुख्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी विजयवर्गीय यांनी या सर्वांचे स्वागत केले.
सात टप्प्यांत तृणमूलला झटका
पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान झाले. त्याप्रमाणे सात टप्प्यांत तृणमूल काँग्रेसला झटका देण्याची तयारी भाजपने केली. यासंदर्भात विजय वर्गीय म्हणाले, मंगळवारी प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडला. आता सात टप्प्यांत तृणमूल नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. यानंतर बुधवारी आणखी एका आमदाराने आणि दोन नेत्यांनी पक्षाला रामराम केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली. 42 जागांपैकी भाजपने 18 जागांवर विजय मिळविला. तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या. काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. 2014 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचे दोन खासदार होते.




























































