
सामना ऑनलाईन । चंदिगड
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नगरविकासमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्या खात्याबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने त्यांना लवकरच मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेपर्यंत पोहचवण्यात मदत केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान स्थानिक काँग्रेस नेत्यांसोबत खटके उडू लागले आहेत. सिद्धू यांच्यामुळे पंजाबमध्ये पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत नगरविकास खात्याच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.























































