शहरभान : लाकडावर कोरलेली जुनी मुंबई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. गजानन शेपाळ 

लाकूड, हस्तीदंत, दगड इ. पृष्ठभागावर अर्धउठावात केलेल्या नक्षीकामास अथवा कोरीव कामास ‘उत्कीर्णन’ असे म्हणतात. चित्रकार श्रीराम मंडाले यांनी बर्मा टिकवूडवर अत्यंत सुबक पद्धतीने कोरीवकाम करीत मुंबापुरीचे जुनं रुपडं उतरवलं आहे. त्याचवेळी त्यांच्या कन्या श्रद्धा यांनीही मुंबईसारख्या शहरात सहज दिसणारी दृष्ये चितारली आहेत. या अनोख्या कलेचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या हीरजी कला दालनात 3 ते 9 जून या काळात भरत आहे.

काष्ठकला ही एक हस्तकला आहे. जपान, चीन, कश्मीर, राजस्थान या ठिकाणी काष्ठकलेला अगदी राजमान्यता मिळालेली दिसते. राजस्थानातील चितौडगढ जिह्यातील बस्सी येथील प्रभातजी सुधार यांनी 355 वर्षांपूर्वी सर्वप्रथम गणगौर अर्थात पार्वतीरूप काष्ठमूर्ती साकारली होती. उदयपूरच्या महाराजा जगतसिंह यांनी मारवाडवरून काही कारागिरांना उदयपूरला बोलावून ‘खराद’ नावाच्या कला प्रकारात म्हणजे एकाच लाकडी ठोकळ्यात कोरीव काम करीत राजप्रासाद सुशोभित करून घेतले. चीनमधील चुनहुई येथे एका काष्ठकोरीव काम करणार्‍या कारागिराने 40 फूट लांब लाकडावर सुंदर नक्षीकाम करून चीन संस्कृती आणि चीन दैनंदिनी कोरली. ती कलाकृती गिनीज बुकमध्ये नोंदली गेली!

ही सारी लाकूड कलाकुसर आणि काष्ठशिल्पाकृतींची चर्चा करण्याचा उद्देशही जुळून आला आहे. मुंबापुरीतील जाहिरात संस्थेत, आर्ट डायरेक्टर म्हणून कल्पना निर्माण करणारे चित्रकार श्रीराम मंडाले यांनी अगदीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कलाकृती साधल्या आहेत. टिकवूड म्हणजे सागाच्या लाकडावर विशिष्ट स्तर तयार करून लेसरकटिंग आणि हस्तकौशल्य यांच्या सहाय्याने कलाकृती साकारल्या आहेत.

हे एक असं प्रदर्शन की, ज्या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती या मुंबई शहराशी निगडित लहान लहान आकृतीबंधांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फ्रेमच्या चौकटीत बसविण्याचा आणि त्याचबरोबर आधुनिक कला प्रवाहातली पेंटिंग्ज सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न श्रीराम मंडाले यांनी केला आहे. श्रीराम यांचं काम म्हणजे बर्मा टिकवूडवर कोरलेलं मुंबापुरीतील पुरातन किंवा अगदी जुनं रूपडं… जणू सृजनच… पारंपरिक शास्त्र्ााrय कलेचं… चीनच्या 40 फुटी काष्ठकारागिरींची गिनीज बुकात नोंद घेण्यात आली, परंतु श्रीराम मंडालेंच्या सुमारे तीसेक काष्ठ शिल्पाकृती म्हणण्यापेक्षा काष्ठपेंटिंग्ज ज्या 5 फुटी कलाकृती आहेत… अर्थातच 40 फुटांहून अधिक स्वरूपात काम आहे… त्याचीही गिनीज बुकात नोंद व्हावयास हवी…!

लाकडावरील कोरीव कलेचं आणि शिल्पकलेचे उत्तम ज्ञान असलेल्या श्रीराम त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीतून आणि तांत्रिक ज्ञानातून कापड, धातू आणि काँक्रीटला त्यांच्या मनाप्रमाणे वळवून वागायला लावतात. त्यांनी निवडलेले काष्ठ पेंटिंग्जचे विषय म्हणजे चित्रकाराच्या ठायी असलेली सर्जनशीलता आणि सघनता कायम ठेवतात.

लाकूड, हस्तीदंत, दगड इ. पृष्ठभागावर अर्धउठावात केलेल्या नक्षीकामास अथवा कोरीव कामास ‘उत्कीर्णन’ असे म्हणतात. श्रीराम मंडाले यांनी नेमकं हेच केलंय 9’’ x 13’’ आकारातील ‘ओपन कॅन्व्हास’ शीर्षकाची कलाकृती म्हणजे 1880च्या दशकातील सर ज.जी. उपयोजित कला महविद्यालय ही हेरिटेज इमारत सुमारे 160 वर्षांचा इतिहास असलेली इमारत केवळ 9’’x13’’ आकारात व्यक्त करण्याचा अगदीच अशक्य वाटणारा प्रयोग सहजयोगाने पूर्ण यशस्वी करून श्रीराम मंडाले यांनी जादुई किमया केलीय. 27’’ x 38’’ आकारातील ‘लव्ह अफेअर वुईथ कलर’, त्याच आकारातील ‘लॉस्ट ट्रेझर’, ‘द प्रिनीज बाऊंटी’, ‘इस्ट मीटस वेस्ट’ अशा एकाहून एक थक्क करणार्‍या कलाकृती पाहताना रसिक मंत्रमुग्ध न होईल तर नवलच..!

आश्चर्याचे सुखद धक्के देत देत रसिक मुंबापुरीच्या जुन्या इतिहासाला जागृत करीत असतानाच त्यांची कन्या श्रद्धा मंडाले हिने चितारलेल्या तशाच काहीशा विषयावरील कलाकृती पहायला मिळतात. मुंबईत सर्वच दृश्य पहायला मिळतात. कानातला मळ काढणारा, मालिश करणारा, बूट पॉलिश करणारा, रस्त्यावर कटिंग – दाढी करणारा, मच्छी विक्रेती आणि बरंच काही…

एकूणच बाप-बेटीची मुंबापुरीवरील माया -प्रेम व्यक्त करण्याची अन् कला रसिकांना अनोखी भेट देण्याची पुनर्निमाणाची कलाकुपी फारच स्मृतिप्रवण ठरणार आहे. हे प्रदर्शन दि. 3 ते 9 जून या काळात जहांगीर कलादालनाच्या हीरजी कला दालनात भरत आहे. तेथे या जागतिक दर्जा ठरू पाहणार्‍या कलाकृती पाहता येतील.

[email protected]