
>> मेधा पालकर
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर गेल्या आठवडय़ात एकाच वेळी अनेक गिर्यारोहकांची गर्दी झाल्याने शिखरावर ‘ट्रफिक जॅम’ची जीवघेणी स्थिती उद्भवली. नेपाळ सरकारने या मोसमात 381 गिर्यारोहकांना एव्हरेस्टवर चढाईसाठी परवाना दिला. शिवाय चीनच्या बाजूनेही एव्हरेस्ट चढाईसाठी येणाऱया गिर्यारोहकांची संख्या मोठी होती. त्यामुळे आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर अधिक वेळ थांबावे लागल्याने गिर्यारोहकांना ऑक्सिजनची उणीव भासली. काहींना डिहायड्रेशनचा त्रास झाला. महाराष्ट्रातील अकलूजचा निहाल याने एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली, पण खाली परतत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाला. मुंबईच्या अंजली कुलकर्णी यांनाही आपला प्राण गमवावा लागला. हे कुठंतरी थांबले पाहिजे. एव्हरेस्ट शिखर आहे त्याच जागी राहणार आहे. मात्र, मानवी चुकांमुळे त्यावर चढाई करणाऱयांना हकनाक प्राण गमवावे लागत आहेत.
सध्या एव्हरेस्ट शिखर चढणाऱया गिर्यारोहकांची संख्या वाढली आहे. एव्हरेस्ट सर करणं ही आजही मोलाची कामगिरी मानली जाते. पण ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लागणारी शारीरिक, मानसिक क्षमता, सराव याकडे गिर्यारोहक तितकेसे लक्ष देताना दिसत नाही. त्यातच नेपाळ सरकारही पूर्वीच्या तुलनेत एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठीचा परवाना मोठय़ा प्रमाणात गिर्यारोहकांना देताना दिसते. पुन्हा न्यूझीलंडसारख्या देशातील काही संस्था कृत्रिम ऑक्सिजनचे सिलिंडर, शेर्पा, बेस कॅम्पमध्ये बसण्यासाठी खुर्च्या, कॉट अशी व्यवस्था शिखरावर करू लागल्या आहेत. साहजिकच एव्हरेस्टवर एक ‘व्यावसायिक’ वातावरण निर्माण झाले आहे. या कंपन्यांनी ‘ग्लॅमर’ तयार केल्याने जो तो उठतो व एव्हरेस्ट सर करण्यासाठी धडपडतो आणि मग शिखरावर गर्दी होते. त्यासाठी नेपाळ सरकारनेच नियमांची कडक अंमलबजावणी केली तर फक्त योग्य प्रशिक्षित गिर्यारोहकच शिखर चढतील, त्यांची मोहीम यशस्वी होईल आणि प्राणदेखील वाचतील.
यासंदर्भात पुण्यातले गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आणि एव्हरेस्ट मोहिमांचे अभ्यासक उमेश झिरपे यांनी सांगितले की, 1992 पर्यंत नेपाळ सरकार एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी जो परवाना द्यायचे ते प्रमाण अगदी मर्यादित गिर्यारोहकांना असायचे. हे शिखर चढण्यासाठीचा परवाना मिळून ते प्रत्यक्ष चढाई करण्यासाठी चार ते पाच वर्षे थांबावे लागायचे. या काळात त्या गिर्यारोहकाला सराव करण्यासाठी वेळ मिळायचा आणि केवळ सराव केलेलाच गिर्यारोहक शिखर चढाई करायचा. मात्र सध्या एका गिर्यारोहकाला परवाना देताना नेपाळ सरकारला 11 हजार अमेरिकन डॉलर मिळतात. त्यामुळे या परवाना वाटपावर नियंत्रण राहिलेले नाही. गिर्यारोहकांसाठी असलेले नियम पाहिले जात नाही. खरं तर ज्याने यापूर्वी सात हजार मीटरपर्यंत शिखर चढाई केले असेल त्याची शारीरिक, मानसिक क्षमता, बेस कॅम्पमधील प्रशिक्षण याविषयी काटेकोर तपासणी करून नंतरच परवाना दिला पाहिजे, पण सध्या शिखरावर नव्या एजन्सीच्या माध्यमातून सर्वच व्यवस्था पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे गिर्यारोहणातला अनुभव नसलेलाही एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी तयार होतो. मुळात गिर्यारोहकालाही समजलं पाहिजे, कुठं थांबायचं? आकर्षणं वाढली, सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे एव्हरेस्ट सर केल्यानंतर मिळणारे ग्लॅमर, मानसन्मान याविषयी अनेकांना आकर्षण निर्माण होत आहे. साहजिकच एव्हरेस्ट शिखर चढाई करणाऱयांची संख्या वाढत आहे. तेव्हा नियमांची कडक अंमलबजावणी झाली तर नक्कीच हे थांबेल. मात्र त्याऐवजी ‘‘एव्हरेस्ट किती जणांचे प्राण घेणार आहे’’ असे बोल त्या शिखराला दिले जात आहे. वास्तविक असे कोणी बोलू नये आणि मानवी चुका कमी करून त्यामधील धोका वेळीच ओळखायला हवा. त्यावर नियंत्रण आणले तर एव्हरेस्ट मोहिमा यशस्वी होतील.
लवकरच अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघाचा अध्यक्ष या नात्याने आम्ही देशातील सर्व गिर्यारोहक संघटनांच्या वतीने नियमांचे निवेदन आपल्या दूतावासाकडे देणार आहोत. जेणेकरून नेपाळ सरकार परवाना देताना नियमांची आणि निकषांची कडक अंमलबजावणी करेल.
एव्हरेस्ट बेस कॅम्प
वसंत ऋतूमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प एखाद्या गावासारखे दिसू लागतात. या वर्षी सुमारे दोन हजार लोक इथे जमले होते. त्यामध्ये 375 गिर्यारोहक आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा समावेश होता. एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेस आणि समुद्रसपाटीपासून 5 हजार 380 मीटर उंचीवर हा बेस कॅम्प आहे. एव्हरेस्टवर चढाई करण्यापूर्वी इथल्या हवामानाची सवय व्हावी यासाठी गिर्यारोहक इथे काही आठवडे राहण्यासाठी जमतात. वातावरणाची सवय व्हावी यासाठी प्रत्यक्ष माऊंट एव्हरेस्ट चढाईपूर्वी काही दिवस वर-खाली जाऊन सराव करतात. यंदा एव्हरेस्टच्या उंचीचे नव्याने मोजमाप करण्यासाठी नेपाळ सरकारने अधिकाऱ्यांचा एक चमू पाठवला होता.
घनकचरा वाढतोय
जेव्हा गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्टवर जातात तेव्हा त्यांच्याकडून टाकण्यात आलेला कचरा त्यांनी स्वतःसोबत परत आणणं अपेक्षित असतं, पण अनेक जण कचरा तिथेच टाकून खाली येतात. हा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. या वर्षी जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाणार आहे. खासगी विमान कंपनी येती एअरलाइन्सने या मोहिमेला सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे. रिकाम्या बीअरच्या बाटल्या, कॅन, पॅक्ड फूड आणि ट्रेकिंग इक्किपमेंट, ऑक्सिजनची रिकामी सिलिंडर्स आदी वस्तूंचा या घनकचऱयात समावेश आहे. एव्हरेस्ट परिसरातून तीन हजार किलो घनकचरा गोळा करून हलविण्यात आला. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून नेपाळ सरकारने हा उपक्रम राबविला. आणखी सुमारे 10 हजार किलो कचरा गोळा करण्याचे नियोजन आहे. यावरूनही एव्हरेस्ट शिखराला कचऱयाने कसा विळखा घातला आहे हे लक्षात येते.
ट्रफिक जॅम का होतो?
एव्हरेस्ट शिखरावर चढाई पूर्ण केल्यानंतर परतताना असलेला मार्ग अतिशय चिंचोळा असून एकावेळी एकजण वर किंवा खाली जाऊ शकतो. या वर्षी 21 ते 24 मे हा एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी ‘ओपन विण्डो’ म्हणजेच उत्तम वातावरण असलेला कालावधी होता. त्यामुळे या काळात शिखर चढाईसाठी नेपाळ सरकारने तब्बल 381 जणांना परवाने दिले होते. प्रत्येक व्यक्तीबरोबर एक शेर्पा असतो. याचाच अर्थ दुप्पट लोक शिखरावर जातात. एका दिवसात 200 जण चढाई करतात. त्यामुळे या चिंचोळ्या मार्गावर चढाई करणाऱ्यांची आणि उतरणाऱयांची गर्दी होते. करचा खाली येइपर्यंत आणि खालचा वरच्या दिशेला जाईपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे दमछाक होऊन अनेक गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागतात. कारण थोडंसं जरी अंतर चुकलं तरी खोल दरीमध्ये पडण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रचंड दमछाक होते.
14 शिखरे सर करणार
जगातले सर्वात उंच आठ हजार 848 मीटर उंच असलेले एव्हरेस्ट शिखर आहे. या शिखरावरीले भौगोलिक परिस्थिती म्हणजे प्रचंड वेगाने वाहणारे वारे, कमी तापमान, प्राणवायूची कमतरता. तेथे सजीव प्राणी राहू शकत नाहीत. अशा स्थितीत हे शिखर सर करणे हे आव्हान असते. कृत्रिम ऑक्सिजनचे पाच सिलिंडर घेऊन वर जावे लागते. एक सिलिंडर साधारण सात ते आठ तास पुरतो. हे सर्व नियोजन करूनच ही मोहीम यशस्वी करण्याचे धाडस करावे लागते. हिमालयात अशी 14 शिखरे आहेत. जी सर करण्याचा संकल्प गिरीप्रेमींनी हाती घेतला. दरवर्षी एक शिखर सर करण्याचा प्रयत्न गिरीप्रेमी करतात. एव्हरेस्टपाठोपाठ लोत्से, माऊंट मकालू अशी ही शिखरे आहेत. त्याशिवाय माऊंट चो आऊ, धवलगिरी, माऊंट मानसलू आणि यावर्षी कांचनजुंगा अशी सात शिखरे यशस्वीरीत्या सर केली. या मोहिमा खर्चिक असतात. प्रचंड आव्हानात्मक असतात. प्रत्येक शिखर वेगळं, तो चढाई करतानाचा अनुभव वेगळा असतो. हे करताना मानसिक, शारीरिक स्वास्थ्य आणि सराव महत्त्वाचा ठरतो. मोहिमांचे नियोजनही काटेकोर असावे लागते. तरच मोहिमा यशस्वी होतात. कांचनजुंगा मोहीम आम्हाला अशीच वेगळा अनुभव देऊन गेली. तिथेही गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांनी उत्तम कामगिरी करताना चढाईसाठी आलेल्या दोन परदेशी व्यक्तींचे प्राण वाचविले. हे सर्व परमेश्वर कृपेने शक्य होते, असे पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आणि एव्हरेस्ट मोहिमांचे अभ्यासक उमेश झिरपे म्हणतात.



























































