प्रफुल्ल पटेलांना ‘ईडी’चे समन्स, हवाई वाहतूक उद्योगातील गैरव्यवहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

हवाई वाहतूक उद्योगातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (एव्हिएशन घोटाळा) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. 6 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

2008-9 मधील युपीए -1 च्या काळातील हे प्रकरण आहे. प्रफुल्ल पटेल तेव्हा नागरी उड्डाणमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला अटक करण्यात आली होती. सध्या तलवार तिहार तुरुंगात आहे. आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग एअर अरेबिया आणि कत्तार या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मिळवून दिले. यासाठी तलवारला 272 कोटी रुपये मिळाले. तलवारने या गैरव्यवहारासाठी राजकारणी, मंत्र्यांबरोबर आणि उच्चपदस्थ अधिकाऱयांबरोबर ‘लॉबिंग’ केली असा दावा ‘ईडी’ने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा मित्र आहे. दोघांमध्ये झालेल्या ई-मेलद्वारे संभाषण झाले होते, असेही ‘ईडी’ने न्यायालयात म्हटले होते. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. ‘ईडी’ने पटेल यांना समन्स बजावले असून, 6 जून रोजी सकाळी 11.30 वाजता चौकशीसाठी हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
‘ईडी’च्या चौकशीवेळी सहकार्य करण्यास तयार आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेबाबत ‘ईडी’ला माहिती देऊ असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?
‘ईडी’ने ऑगस्ट 2017 मध्ये घोटाळ्याची चौकशी सुरू केली. सीबीआयनेही नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी, एअर इंडिया, एनसीआयएल आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल होताच दीपक तलवार देश सोडून पळाला. त्याला दुबईत अटक झाली. प्रत्यार्पण करून हिंदुस्थानात आणण्यात आले.

आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना दिले. यामुळे हिंदुस्थान सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबरोबर आर्थिक स्थिती नसतानाही नागरी उड्डाण मंत्रालयाने 70 हजार कोटी रुपये किमतीच्या 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणुकीतून प्रशिक्षण संस्था सुरू करणे तसेच आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर असणारे काही मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरू आहे. हा गैरव्यवहार यूपीए-1 सरकारच्या काळातील असून, प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाणमंत्री होते.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी गोंदिया येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक इशारा दिला होता. तिहार जेलमधील एका कैद्याने राष्ट्रवादीच्या नेत्याची झोप उडवली आहे. तो कैदी काय बोलणार याकडे या नेत्याचे लक्ष लागले आहे. तो बोलायला लागला की सारे सत्य समोर येईल असे मोदी यांनी म्हटले होते.