
सामना प्रतिनिधी । नगर
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीमध्ये राज्यस्तरीय 36 संघटनाचा समावेश आहे. संघटना समन्वय समितीच्या नेतेपदी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समन्वय समिती पदाधिकाऱ्यांची बैठक 30 मेरोजी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत महाजन यांच्या लोकाभिमुख कार्याचा अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कंझरकर यांनी दिली. या निवडीबद्दल गिरीश महाजन यांचा सत्कार मुंबई येथे करण्यात आला. यावेळी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे,राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव कोळी,पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गिरीष वाणी, उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष इल्हाजुद्दीन फारूकी,समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष अरूण जाधव,केंद्रप्रमुख संघाचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले, इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर सह अन्य संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील शिक्षक, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक,शिक्षण विस्तार अधिकारी,महिला शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न अनिर्णित आहेत. त्या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत समन्वय समिती पदाधिकारी व अधिकारी यांची लवकरच मंत्रालय येथे संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल असे महाजन यांनी सांगितले. जुलै 2019 मध्ये समन्वय समितीच्या वतीने राज्यातील उपक्रमशील शिक्षक,केंद्रप्रमुख व अधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान गिरीष महाजन व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


























































