
सामना ऑनलाईन। पठाणकोट
जम्मू-कश्मीरातील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी पठाणकोट न्यायालयाने तीन नराधम दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच या तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठाविला आहे. अन्य तीन दोषी पोलिसांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठाविली.
सोमवारी सकाळी पठाणकोट विशेष न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरविले. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अल्पवयीन आरोपी विरोधातील कोर्टात खटला चालणार आहे. दुपारी न्यायालयाने सहा आरोपींना शिक्षा सुनावली. मुख्य आरोपी सांझी राम, परवेश कुमार आणि दीपक खजुरिया या तिघा नराधमांना अपहरण, बलात्कार, हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, हेडकॉन्स्टेबल तिलक राज आणि एसपीओ सुरेंदरकुमार वर्मा या तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविली आहे.
नराधमांना फासावर लटकवा – महिला आयोग
पठाणकोट न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे; पण नराधम आरोपींना आणखी कठोर शिक्षा हवी. नराधमांना फाशीच दिली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे. बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या रोखण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे.
देशाला सुन्न करणारी घटना
10 जानेवारी 2018 रोजी कठुआ येथून आठ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अत्यंत निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला. 17 जानेवारी 2018 रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. सुरुवातीला या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केले. मात्र, या भयंकर घटनेचे वृत्त देशभरात पसरले. अवघा देश सुन्न झाला. अनेक ठिकाणी या मुलीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन, मोर्चे निघाले. n 9 एप्रिल 2018 रोजी पोलिसांनी आठ आरोपींपैकी सात जणांविरुद्ध कठुआ कोर्टात आरोपपत्र दाखल केले. 7 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जम्मू-कश्मीरबाहेर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंजाबमध्ये पठाणकोट येथे विशेष न्यायालयात सुनावणी झाली. 15 महिन्यांनंतर सोमवारी निकाल लागला आहे.




























































