
सामना प्रतिनिधी। मुंबई
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱया भाविकांच्या सोयीसाठी 3 हजार 724 जादा बसेस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटीचे सुमारे पाच हजार चालक-वाहक, व इतर कर्मचारीवर्ग येत्या 10 ते 16 जुलै दरम्यान पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी तत्पर राहणार आहे.
आषाढी यात्रेसाठी एसटी दरवर्षी विशेष वाहतुकीचे नियोजन करते. यंदाही एसटीने आषाढी एकादशीनिमित्त करावयाच्या वाहतूक नियोजनासाठी पुणे येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. पंढरपूरची आषाढी वारी जगभरात प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्याच कानाकोपऱयातून नव्हे, तर इतर राज्यांतूनही भाविक या यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱया बसेस तांत्रिकदृष्टय़ा दोषरहित असाव्यात, त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहण्याचे आदेश परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
माइल्ड स्टीलच्या 1200 बसेस
एसटीने अलीकडेच माइल्ड स्टीलचा वापर करून नव्याने बांधणी केलेल्या मजबूत अशा 1200 आकर्षक बसेस भाविकांच्या सोयीसाठी यंदा वापरण्यात येणार आहेत. तसेच अलीकडेच तयार केलेल्या ‘विठाई’ बसेसही भाविकांच्या सोयीसाठी तैनात असणार आहेत. पंढरपूरकडे येणाऱया विविध प्रमुख मार्गांवर राज्यभरात एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.
नाव बसेस
संभाजीनगर 1097
पुणे 1080
नाशिक 692
अमरावती 533
मुंबई 212
नागपूर 110



























































