
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
कोलकाता येथील दोन निवासी डॉक्टरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरु झालेले डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन आता देशभर पसरले आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुण्यासह निवासी डॉक्टर संपावर गेले असून, रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रविवारी रात्री उपचार सुरू असताना एका 74 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि जमावाने दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला करीत बेदम मारहाण केली. सोमवारपासून कोलकातासह पश्चिम बंगालमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेले. या संपाची दखल घेऊन ‘आयएमए’ने पाठिंबा दिला आणि शुक्रवारपासून तीन दिवस बंदची हाक दिली. त्यानंतर देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
डॉक्टरांचे राजीनामे
संपावर असलेल्या निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी राजीनाम्यांचे सत्र सुरु केले आहे. पश्चिम बंगालमधील 43 डॉक्टरांनी गुरुवारी राजीनामे दिले होते. तर शुक्रवारी दार्जिलिंग येथील नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेजमधील 119 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.
‘आयएमए’चे गृहमंत्री शहा यांना पत्र
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. देशभरात डॉक्टरांवर हल्ले वाढले आहे. हे रोखण्यासाठी राष्ट्रीय कायदा तयार करावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
ममता यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये – डॉ. हर्षवर्धन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळून देशभरातील रुग्णांचे मुद्दा करू नयेत. त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवधन यांनी केले आहे. तसेच डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
खासगी डॉक्टरांचा सोमवारी संप
सोमवार, 17 जून रोजी देशव्यापी संपाची हाक इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. खासगी क्लिनिकमधील ओपीडी बंद राहतील, मात्र आपत्कालीन सेवा सुरू असतील. या संपामुळे देशभरातील 3 लाख खासगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत.
ममता बॅनर्जी यांच्या माफीची मागणी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील ‘एसएसकेम’ रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी बाहेरील लोक येवून आंदोलन भडकवित असल्याचा आरोप केला. तसेच संपकरी डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी सहा अटी ठेवल्या. यामुळे डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून, मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे.
मुंबईसह राज्यातील ‘ओपीडी’ कोलमडली
निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘काम बंद’ आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळपासूच जाणवू लागला आहे. राज्यभरातील 4500 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यात मुंबईतील 2800 डॉक्टर्स आहेत. यामुळे सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमधील ओपीडी सेवा कोलमडली आहे.
राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केले. पुण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद ठेवत निदर्शने केली.




























































