टाकळी हाजीत चोरट्यांचा सुळसुळाट, शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

तीव्र पाणी टंचाई व भीषण दुष्काळामधे होरपळणाऱ्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झालाय. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंप ,केबल वायर चोरीच्या सत्राने शेतकरी हवालदिल झाला असतानाच, टाकळी हाजी तालुका शिरूर येथील एका शेतक-याचा एक ट्रॅक्टरच चोरट्यांनी पळवला. यामुळे शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या चोरांच्या मुसक्या आवळणार का ? याकडे आता या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिरूरच्या बेट भागासह कवठे येमाई, टाकळी हाजीत दुष्काळी परीस्थिती निर्माण झाली असतानाच आता चोऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. टाकळी हाजी टेमकर वस्ती येथे राहणारे शहाजी तबाजी साळवे यांच्या घराशेजारी लावलेला महिंद्रा कंपनीचा डी आय ५७५ टॅक्टर Mh 12 GN 6041 चोरीला गेला. याबाबत संभाजी तबाजी साळवे यांनी टाकळी हाजी पोलीस चौकीमधे फिर्याद दिली असून, त्यानुसार शेतमजुर प्रकाश बाळु गांगड तसेच प्रफुल पोपट खटाटे रा टाकळी हाजी व इतर एक इसम अशी तीन व्यक्तीनी मिळुन ट्रक्टर चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील खटाटे हा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, अनेक वेळा तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय जाधव करीत आहेत.

आरोपींनी हा ट्रॅक्टर चोरून ते जवळा ता. पारनेर मार्गे पसार झाले असून, ही घटना सीसीटीव्ही मधे कैद झाल्याचे समजते. यांना पकडल्यास परिसरामधील अनेक चोऱ्यांची उकल होणार असून, जनतेचे पोलिसांच्या कारवाई कडे लक्ष लागले आहे.

तीन दिवसापूर्वीही चांडोह येथेही चोरी झाली, तसेच घोडनदी वरील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंप चोरीस गेले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील महिन्यापासून घोडनदी कोरडी पडली असून नदी किनारी असणारे शेतीपंप व केबल चोरटे लक्ष करीत आहेत. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी त्वरीत चौकशी करून आरोपी जेरबंद करावेत अशी मागणी टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे यांनी केली आहे.