अयोध्येत भगवे ढग, उद्धव ठाकरे 18 विजयी खासदारांसह घेणार रामलल्लाचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अयोध्या

मुंबईत पाऊस कोसळतोय, पण उत्तरेत मात्र अद्यापि सूर्याचा प्रकोप आहे. पावसाचे काळे ढग अजून येथे पोहोचले नसले तरी अयोध्येच्या आभाळात ‘भगव्या’ ढगांनी एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज रविवारी सहकुटुंब अयोध्यानगरीत आगमन होणार असून सकाळी 9 वाजता ते शिवसेनेच्या 18 विजयी खासदारांसह पवित्र रामजन्मभूमीतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येत आता शिवसैनिकांचेही आगमन होऊ लागले असून शहरात सर्वत्र भगवे वातावरण आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात अयोध्येत रामजन्मभूमीवर येऊन रामलल्लाचे दर्शन घेतले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आपण पुन्हा येऊ असे वचन त्यांनी अयोध्यावासीयांना दिले होते. त्या वचनपूर्तीसाठीच उद्धव ठाकरे रविवारी अयोध्येत येत आहेत.शिवसेनेचे सर्व विजयी खासदार शनिवारीच अयोध्येत दाखल झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी विमानाने फैजाबादला पोहोचतील. तेथून ते रामलल्लाच्या दर्शनासाठी रामजन्मभूमीकडे रवाना होतील. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील प्रसारमाध्यमांनी या दौऱयाच्या वार्तांकनासाठी अयोध्येत एकच गर्दी केली आहे.

जागोजागी होर्डिंग्ज, स्वागताचे फलक

अयोध्यानगरी जणू भगव्या रंगानेच सजली आहे. शहरातील सर्व प्रमुख मार्ग आणि रस्तोरस्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य कटआऊटस्, उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची होर्डिंग्ज आणि फलक दिमाखात झळकत आहेत. शिवसेनेचा भगवा झेंडाही डौलाने फडकत आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या यात्रेमुळे नगरवासीयांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था
या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरे यांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा दिला आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सकाळी 9 वा. अयोध्येत दाखल होतील. त्यानंतर 10 वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली.