
सामना ऑनलाईन,लंडन
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानकडून झालेल्या दारुण पराभवामुळे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. या पराभवामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) पाकिस्तानमध्ये टीकेची झोड उडाली आहे. ‘पीसीबी’चे पदाधिकारी संघाची रणनीती तयार करण्याऐवजी नुसतेच इंग्लंडच्या टूरवर आले आहेत. आपले कुटुंबीय व नातेवाईकांना सामन्याची तिकिटे मिळवून देण्यातच ते मशगुल आहेत. संघाची कामगिरी सुधारण्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, असा आरोप केला जात आहे.
गटबाजीचे आरोप
पाकिस्तानच्या विद्यमान संघात सध्या गटबाजीने थैमान घातले आहे. त्यात एक गट ज्येष्ठ गोलंदाज मोहम्मद आमिरचा असून दुसरा युवा खेळाडू ईमादचा आहे. इमाद गटाच्या शोएब मलिक, बाबर आजम आणि इमाम-उल-हक यांची सर्फराजविरुद्धची कटकारस्थानेच पाकिस्तानच्या रविवारच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला.

























































