
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच मुंबईतील रेल्वे प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून सध्याच्या घडीला मुंबईच्या लोकलमधून दररोज सरासरी 80 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहावा अतिरिक्त रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र सहावा मार्ग पूर्ण करण्यासाठी 2021 वर्ष उजाडणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील वाहनांची संख्या वाढूनही अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.
आर्थिक पाहणी अहवालात मुंबईतील उपनगर रेल्वे प्रकल्पांविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यात मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत प्रकल्पांची सध्याची स्थिती आणि रेल्वे अपघातील मृत्यू व अपघातांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. त्यात ठाणे-दिवा हा सुमारे 9.44 किमी लांबीचा पाचवा व सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानचा सहावा अतिरिक्त मार्ग आणि सीएसटी ते कुर्लादरम्यानचा अतिरिक्त पाचवा व सहाव्या मार्गाची माहिती दिली आहे. त्यानुसार या मार्गावरील सर्वात मोठय़ा मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानच्या अतिरिक्त सहाव्या मार्गाचे काम 2021 पर्यंत अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.
राज्यात मोटारींच्या संख्येत वाढ, पण अपघातांमध्ये घट
वाढत्या शहरीकरणासोबत लोकसंख्येत आणि पर्यायाने मोटारींच्या संख्येतही वाढ झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे. परिवहन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2019 रोजी राज्यात 3 कोटी 49 लाख वाहने रस्त्यावर धावत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत वाहनाच्या संख्येत 7.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील एकूण वाहनांपैकी 35 लाख 75 हजार वाहने मुंबईतल्या रस्त्यावर धावत आहेत.


























































