
सामना प्रतिनिधी । मुंबई
अकरावीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा बुधवारी पहिल्याच दिवशी खेळखंडोबा झाला. विद्यार्थ्यांना अर्जातील भाग दोन म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरायचा होता, पण अकरावीच्या वेबसाईटवरून अर्जच गायब झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे दहावीचे गुणही अर्जात अपलोड होण्यास विलंब लागत होता. सर्व्हर डाऊन असल्यामुळे शाळांमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्याच दिवशी कासवगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
दहावीची मूळ गुणपत्रिका उद्या
दहावीच्या मूळ गुणपत्रिकेचे वाटप शुक्रवारी दुपारी 3 वाजता शाळांमधून होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका हातात आल्यानंतरच ऑनलाईन अर्जात आपोआप अपलोड होणारे गुण तपासता येणार आहे.
प्रवेशप्रक्रिया सुरळीत
अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरळीत सुरू असून शिक्षण उपसंचालक कार्यालयात सर्व्हर डाऊनविषयी तक्रारी आलेल्या नाहीत. अर्ज भरण्याचे काम व्यवस्थित होत आहे. – राजेंद्र अहिरे, शिक्षण उपसंचालक, मुंबई
सकाळी फक्त दोन-तीनच अर्ज भरता आले
दहावीच्या एकूण 129 विद्यार्थ्यांसह एटीकेटीच्या 12 असे एकूण 141 विद्यार्थ्यांचे अकरावीचे ऑनलाईन अर्ज भरायचे असून बुधवारी पहिल्याच दिवशी केवळ दोन-तीनच अर्जच भरले गेले. वेबसाईट ठिक होण्याची दुपारपर्यंत वाट पाहून अखेर विद्यार्थ्यांना घरी पाठवले. गुरूवारीदेखील ही समस्या उद्भवल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. – अंबरसिंग मगर, मुख्याध्यापक, कुलाबा महापालिका माध्यमिक शाळा
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सर्व्हर डाऊनच
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर काही वेळानंतर सर्व्हर डाऊन झाला. सकाळी सुरू झालेला हा तांत्रिक गोंधळ दुपारी साडेतीन वाजल्यानंतर संपला, पण तोवर बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज न भरताच त्यांना घरी पाठवल्याने विद्यार्थ्यांना अर्जच भरता आलेले नाहीत.
ऑनलाइन अर्ज भरताना ही काळजी घ्या
- ऑनलाइन अर्जातील भाग 1 ऍप्रूव्ह झाल्यानंतरच भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येईल.
- कॉलेज पसंतीक्रम भरताना मागील वर्षाची कटऑफ आणि स्वतःचे गुण याची सांगड घाला.
- पसंतीनुसार किमान एक ते कमाल दहा कॉलेजचे पसंतीक्रम भरता येतील. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेणे सक्तीचे आहे.
- कॉलेज निवडण्यासाठी आधी शाखा आणि माध्यम निश्चित करा. त्यानंतर प्रवेश हवा असलेल्या कॉलेजची यादी तयार करून मगच कॉलेजचे क्रम ठरवा.
- ज्या कॉलेजमध्ये प्रवेश नकोय त्या कॉलेजचा समावेश पसंतीक्रमात करू नका.




























































