
सामना ऑनलाईन । मुंबई
‘एक देश, एक निवडणूक’बाबत चर्चा करण्यासाठी व सर्व पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक बैठक झाली. या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मात्र मोदी सरकारच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. देवरा यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत त्यांचे मत मांडले आहे. या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसचे बहिष्कार घालणं दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
My personal views on the ongoing #OneNationOneElection debate pic.twitter.com/dUxP5BeJ80
— Milind Deora (@milinddeora) June 19, 2019
‘मी माजी खासदार आहे व चार वेळा निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सतत देशात निवडणुका सुरू राहणं हे सुशासनामध्ये अडथळा निर्माण करतं. सततच्या निवडणुकांमुळे नेते महत्वाच्या मुद्दांकडे लक्ष देऊ शकत नाही आणि सध्या हा देशासमोरील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे असे मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे. 1967 पर्यंत देशात एकत्रित निवडणुकाच होत होत्या याची आठवणही देवरांनी करून दिली आहे. ‘एक देश एक निवडणूक’ हा देशातील एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो’, असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
मिलिंद देवरांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की काँग्रेसने ‘एक देश एक निवडणूक’च्या बैठकीवर टाकलेला बहिष्कार हा दुर्दैवी आहे. ‘हिंदुस्थानातील काही राजकीय पक्ष ज्याचा मी स्वत: देखील हिस्सा आहे ते आता चर्चा, संवाद आणि एकत्र मिळून काम करणे याचे महत्त्व विसरत चालले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच हिंदुस्थानच्या लोकशाहीसाठी धोक्याचे देखील आहे.’ असे सांगत देवरा यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
‘एकत्रित निवडणुकांचा केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला फायदा होईल याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा नाही. यंदाच्या लोकसभा निवडणूकीसोबत अरुणाचल प्रदेश, ओडीशा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यातील दोन राज्यांमध्ये अशा पक्षांना बहुमत मिळालं आहे ज्यांची भाजपसोबत युती नव्हती’, असे देखील या पोस्टमध्ये देवरा यांनी नमूद केले आहे.

























































