
>> वैष्णवी कानविंदे-पिंगे
अजरामर प्रेमकथा नेहमी काट्याकुट्यातून जातात असं म्हणतात. त्याच काटेरी मार्गाला लक्षात घेऊन बांधलेली प्रेमकथा म्हणजे कबीर सिंग अथवा पूर्वाश्रमीचा अर्जुन रेड्डी (या सिनेमाचा दाक्षिणात्य रिमेक.) यामध्ये प्रचंड हाणामारी आहे, प्रेम, गाणी, विरह असं सगळं आहे… पण मुळात त्यात नावीन्य असं काही नाही. ही काही घडलेली कथा नाही आणि हिंदी अर्जुन रेड्डीची कट टू कट कॉपी आहे. मग प्रश्न उरतो की जवळ जवळ तीन तास वेळ खाणारा हा सिनेमा नेमका का पाहावा?
अत्यंत गरम डोक्याचा, निर्भीड, स्वतःच्या मानाने वागणारा हुशार वैद्यकीय विद्यार्थी. एका मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्यासाठी तो इतका वेडा होतो की तिच्याशिवाय दुसरं काही त्याला सुचतच नाही. पण दुर्दैवाने घरच्यांच्या विरोधाने तिचं लग्न होतं आणि मग मुळातच गरम डोक्याचा हा शल्यविशारद स्वतःवरचा ताबा हरवून बसतो. दारू, ड्रग, सेक्सच्या नादी लागतो. स्वतःची वाट लावायला सुरुवात करतो. पुढे त्याचं काय होतं. प्रेमात हरल्यावर आयुष्याची वाटच लागते की नवीन मार्ग मिळू शकतो, याची कथा म्हणजे ‘कबीर सिंग’ हा सिनेमा.
अगदी पट्टी घेऊन बसल्यासारखा हा सिनेमा जराही इथे नाही, तिथे नाही… म्हणजे एक दृश्य अर्जुन रेड्डीचं बघावं आणि दुसरं कबीर सिंगचं. जराही व्यत्यय येणार नाही. खरंच असा सिनेमा उभा करणार्या दिग्दर्शकाचं आश्चर्य वाटतं. पण मग या सिनेमामध्ये तो सिनेमा तसाच बनवलाय ना इतकीच उत्सुकता उरते. त्यापलीकडे काहीच नाही. मुळात रिमेक करताना तेच करतात अजून काय करणार असं वाटू शकतं. तर याचं उत्तर असं आहे की रिमेक करताना सिनेमाची लांबी प्रचंड कमी करता आली असती. मुळात दक्षिणेकडे मोठा सिनेमा चालतो, पण बॉलीवूडमध्ये लांबी बघून आधीच नाक मुरडलं जातं. तेच या सिनेमाबाबत झालंय.
शाहिद कपूरचा अभिनय बारा झालाय. तो स्टायलिश अभिनेता आहे यात वादच नाही. पण त्याला आजवर जे काही चांगले रोल मिळाले आहेत त्यातलाच हा एक म्हणता येऊ शकतो. कियारा अडवानी या सिनेमात खूपच छान दिसते. एखाद्या बाहुलीसारखी. तिची भूमिकाही बाहुलीसारखीच आहे. पण तरीही तिने काम चांगलं केलंय. बाकी अर्जन बावेजा, सुरेश ओबेरॉय वगैरे मंडळींना काही विशेष काम नाही. त्याच्या मित्राची भूमिका साकारणारा सोहम मुझुमदार मात्र खास लक्षात राहतो. या सिनेमाचे काही संवाद नक्कीच चांगले आहेत. चार दोन हसे यशस्वीरीत्या वसूल करतात. सिनेमाची सुरुवातीची दृश्ये छान आहेत. कॉलेजमधील वाचक विनोदी पद्धतीने मांडलाय. त्यात तार्किकता नसली तरी थोडा टाईमपास नक्कीच होतो. पण पटकथेत मात्र हा सिनेमा कमालीचा गंडलाय. स्थळांमधे अंदाज लावताना गोंधळ उडतोच, पण नंतर नंतर दारूकामात इतका तोच तोचपणा येतो की कंटाळा यायला लागतो. त्यात शेवट असा उगाच उरकल्यासारखा आणि म्हणून विनोदी झालाय.
लोकेशन चांगलं घेतलंय. सिनेमा डोळ्यांना सुखद आहे. जोडीला ऍक्शनची दृश्येही सिनेमाच्या गाभ्याला साजेशीच आहेत. संगीत ठीक ठाक… म्हणजे खास लक्षात राहत नाही. एकूणच सिनेमाच फारसा लक्षात राहात नाही. केवळ शाहिद आवडत असेल तर हा सिनेमा पाहावा. कारण जवळ जवळ प्रत्येक फ्रेममध्ये तो दिसतो किंवा अर्जुन रेड्डी बघितला असेल तर ताडून बघायची गंमत अनुभवायला हा सिनेमा पहा… बाकी काही कारण नाही.
चित्रपट : कबीर सिंग
दर्जा : * 1/2
निर्माता : मुरड खेतनी, अश्विनी वर्दे, भूषण कुमार, किशन कुमार
दिग्दर्शक-लेखक : संदीप वांगा
संगीत : मिथुन, विशाल मिश्रा, अमल मलिक, अखिल सचदेव, संचेत-परंपरा
कलाकार : शाहिद कपूर, कियारा अडवाणी, अर्जन बावा, सुरेश ओबेरॉय,
सोहम मुझुमदार, निकिता दत्ता, कामिनी कौशल.






























































