मंत्रालयात पाणी पिऊ नका, उलटी, जुलाबाने कर्मचारी हैराण; विधान परिषदेत उमटले पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

सामना प्रतिनिधी । मुंबई

एकीकडे विधिमंडळात दुष्काळामुळे पाणी प्रश्न पेटला असताना मंत्रालयातील कर्मचार्‍यांना मात्र पाणी बाधले. रोजच्याप्रमाणे आपल्या कामाची सुरुवात पाणी पिऊन केल्यानंतर याच पाण्याने कर्मचार्‍यांना हैराण केले. शेकडो कर्मचार्‍यांना सकाळी 11 वाजल्यापासूनच उलट्या, मळमळ, जुलाब असा त्रास होऊ लागल्याने काम करणेही अशक्य झाले. यामुळे काहींना डय़ुटी सोडून थेट घर गाठावे लागले. या दूषित पाण्याचे पडसाद थेट विधान परिषदेतही उमटल्याने  सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

मंत्रालयात 11 ते 2 वाजण्याच्या सुमारास कर्मचार्‍यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे उलट्या आणि मळमळण्याची. सर्वाधिक त्रास हा पहिल्या आणि तळमजल्यावरील कर्मचार्‍यांना झाला. त्यामुळे या मजल्यांवरील पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात आले. अनेकांनी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणून आपली तहान भागवली.

दोन दिवसांत कारवाई

कर्मचार्‍यांना होत असलेल्या या त्रासाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. दूषित पाण्याबाबत कर्मचार्‍यांनी अनेक वेळा तक्रार केल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर उत्तर देताना सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील सर्व टाक्यांची साफसफाई वेळोवेळी करण्यात आली असल्याचे सांगितले. ही समस्या मंत्रालयात सर्वत्र नसून काही विशिष्ट ठिकाणी आहे. दोन दिवसांत या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.