अफगाण संघाने किमान ‘अबू खां’ची बकरी व्हावं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

आपल्या देशात पाऊस येण्यासाठी, वरुणराजाला साकडं घातलं जातं, काही भाविक मंडळी यज्ञसुद्धा करतात. ‘पाऊस नको’ म्हणून एखादा मंत्रबिंत्र अस्तित्वात आहे का? असेल तर इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी ‘सपोर्ट स्टाफ’बरोबर एक मांत्रिक पाठवा (तेवढंच राहिलंय). कारण पाऊस हिंदुस्थानी संघाच्या प्रेमात पडलाय. एखाद्या ‘गल्ली’ रोमियोने ‘गल्ली’ ज्युलिएटचा पाठलाग करावा तसा पाऊस हिंदुस्थानी संघाचा पाठलाग करतोय. बुधवार-गुरुवारी साऊदम्प्टनमध्ये पाऊस कोसळला (इथे रिपरिप पडणार्‍या पावसाला कोसळणं म्हणतात). त्यामुळे हिंदुस्थानी संघाला नीट सराव करता आला नाही. निदान मी हा लेख लिहीत असताना शनिवारी हवामान खातं साऊदम्प्टनला सूर्यदेवाच्या आगमनाची वर्दी देतंय. रोहित-विराट या पॉपिंग क्रिझच्या दोन राजपुत्रांपैकी कुणाचं तरी मोठ्ठं शतक पाहावं ही त्याची इच्छा असावी.

काल बुमराने जाहीर केले की, इंग्लंडमध्ये गोलंदाजांना मदत मिळत नाही. खेळपट्ट्या पाटा आहेत. अलीकडे सावळे ढगसुद्धा गोलंदाजाला मदत करत नाहीत. ‘मेरे देश की धर्ती रन उगले, उगले हिरे मोती’ हे इंग्लिश संघाचं आजचं स्फूर्ती गीतं आहे. बुमराच्या लक्षात असेल की, गेल्या वर्षी हिंदुस्थानी संघ कसोटीसाठी इथे होता तेव्हा चेंडू स्विंग होत होता. अर्थात तो लाल चेंडू होता आणि लाल व पांढर्‍या चेंडूत फरक आहे, पण या विश्वचषकात खेळपट्ट्या खास इंग्लंडसाठी ‘बनवल्या’ आहेत की काय असा संशय येतो.

इंग्लिश संघाचा मुख्य डावपेच आक्रमकपणे फलंदाजी करणं हा आहे. कारण आजच्या त्यांच्या संघाची ती ताकद आहे. 2015च्या ऑस्ट्रेलियातल्या विश्वचषकात त्यांना बांगलादेशनेही हरवलं होतं. तिथून तोंड काळं करून मायदेशी परतल्यावर त्यांनी फलंदाजांची अशी फौज तयार केली की, जे आक्रमकपणे फलंदाजी करू शकतील. मग त्यासाठी पोषक खेळपट्ट्या हव्यात. कारण चेंडू स्विंग होणार्‍या खेळपट्टीवर दांडपट्टा फिरवता येत नाही. म्हणून या खेळपट्ट्या बदललेल्या दिसतात. या खेळपट्ट्या पाहून स्वर्गातून फ्रेड टमनने आयसीसीला त्याच्या खास शैलीत शिव्या हासडल्या असतील. कारण अशा खेळपट्ट्या पाहायची त्या पिढीला सवय नव्हती. कारण त्या काळातले त्यांचे फलंदाज सिम होणार्‍या खेळपट्टीवरही धावा करत. मला एक गंमत आठवते. 1989 साली ऑस्ट्रेलियाच्या ऑल्डरमनने इंग्लंडमध्ये चेंडू भन्नाट स्विंग केला. 1990 साली हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये आला. आदल्या वर्षीच्या ऑल्डरमनच्या स्विंगमुळे कपिल-प्रभाकर वगैरे खुशीची गाजरं खात होते, पण 1990 साली चेंडू तसा स्विंग होईना. लॉर्डस्ला मी आणि हर्षा भोगले चहा पित असताना तिथे ऍलेक बेडसर आले. मला खाज ना, म्हणून मी बेडसरला विचारलं, ‘‘कपिलचा चेंडू का स्विंग होत नाही?’’ ते खाडकन म्हणाले, ‘‘बॅड ऍक्शन!’’ आता कपिलच्या ऍक्शनचं कौतुक आम्ही नेहमी केलेले. त्याची साईड ऑन ऍक्शन. त्यामुळे त्याला मिळणारा नैसर्गिक आऊटस्विंग, हा आमच्या त्याच्या कौतुकाचा केंद्रबिंदू होता. बरं, ऍलेक बेडसरला आम्ही काय सांगणार? डॉन ब्रॅडमनच्या मते त्याने दोन हात केलेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजे ऍलेक बेडसर! यापेक्षा बेडसरला आणखी कुठलं ऑस्कर मिळू शकतं? त्यामुळे मला स्विंग हा कधी कधी किचकट विषय वाटतो. थिअरी पक्की असली तरी व्यवहारात यश मिळतं असं नाही, पण बुमराला कशाला करायचीय काळजी? तो स्विंग या एकाच आयुधावर थोडाच अवलंबून आहे? त्याची ती ट्रफिक पोलिसासारखी हाताची पोझिशन, त्याच्या स्टार्टच्या मानाने त्याचा तो फसवा वेग, चेंडूची उसळी, यॉर्कर आणि अचूकता असताना कसली आलीय चिंता? पण त्याने सराव करताना जाळीत यॉर्कर टाकताना जरा जपून टाकावेत. त्याच्या एका यॉर्करने विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला इजा झाली. त्याला विकेट्स प्रतिस्पर्ध्याच्या काढायच्या आहेत. आपल्या नाहीत.

पण सध्या आपल्याला फलंदाजीची काळजी नाही. माझ्या मते रिषभ पंतला अफगाणिस्तानविरुद्ध खेळवून टाकाच. त्याला सराव  होईल आणि मोठ्या धावा मिळाल्या तर आत्मविश्वाससुद्धा वाढेल. शमी तर खेळेलच, पण जाडेजाला संधी द्यायचीसुद्धा हीच वेळ आहे. राखीव खेळाडूंना सराव मिळायला हवा. कारण कधी कधी एखादा खेळाडू जखमी होऊन  राखीव खेळाडूला अचानक मोठ्या सामन्यात खेळायची वेळ येऊ शकते. आपण सध्या सुस्थितीत आहोत. बाद फेरीत आपला प्रवेश जवळ जवळ नक्की आहे (पावसाने मात्र खलनायक होऊ नये) आणि अफगाणिस्तानचा संघ कमकुवत आहे. राऊंड रॉबिन स्पर्धेची तो संघ ‘पंचिंग बॅग’ झालाय.

आजपर्यंत प्रत्येक सामन्यात पहिल्या तीन फलंदाजांनी खोर्‍याने धावा केल्या आहेत. त्यामुळे मधल्या फळीवर कधी दबावच पडला नाही. या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? याबद्दल केवढी चर्चा झाली. कश्मीर प्रश्ना खालोखालची ती महत्त्वाची चर्चा होती. रोहित-विराटने तो प्रश्नच ‘कामकाजा’तून काढून टाकला. वेळच अशी आलीय की, प्रत्येक वेळी हार्दिक पांड्याला बढती द्यायला लागते. तो येतो, गोळीबार करतो आणि निघून जातो. ‘जेम्स बॉण्डप्रमाणे लायसन्स टू किल’चा परवाना मिळवल्याप्रमाणे तो फलंदाजी करतो. त्यामुळे मधल्या फळीला कधी परीक्षांना बसावंच लागतं नाही. अगदी विश्वचषक आपण जिंकेपर्यंत अशीच परिस्थिती राहावी अशी आपली इच्छा आहे, पण इंग्लिशमध्ये म्हणतात ना, “If wishes were horses then beggars would ride” कधी दगाफटका झाला, वरचे फलंदाज लवकर बाद झाले की, मधल्या फळीची परीक्षा सुरू होते. त्या परीक्षेत मधल्या फळीला किती गुण मिळतात यावर संघाचं भवितव्य ठरतं. त्यामुळे चांगली सुरुवात झाली तर धोनी, पंत, जाधव यांना सराव मिळेल हे पाहावे. कधीतरी ‘गोळीबारा’ची संधी यापैकी कुणाला तरी द्यावी. म्हणजे गरज पडेल तेव्हा त्यांच्या बंदुका गंजलेल्या नसतील.

क्रिकेटमध्ये कुणालाच कमी लेखू नये, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात करणार्‍या अफगाणिस्तानच्या संघाची या विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक आहे हे कबूल करायला हवं. टी-20 हे सिनेमातलं तीन-चार मिनिटांचे गाणं असेल तर पन्नास षटकांचं वन डे क्रिकेट हे नाटय़ संगीत आहे. तरीही एशिया कपमध्ये त्यांनी श्रीलंका-बांगलादेशला हरवलं होतं. आपल्याबरोबरचा त्यांचा सामना टाय झाला होता. अगदी गेल्या सप्टेंबरमध्ये हे घडलं. त्याला एक वर्षसुद्धा झालेलं नाही. म्हणजे पाळण्यातलं बालक चालायला लागलं होत, पण त्यानंतर या विश्वचषकापर्यंत त्यांचा वन-डेच्या स्तरावर एकही सामना हिंदुस्थान सोडून मोठ्या संघांविरुद्ध झालेला नाही. या विश्वचषकातला पहिला सामना हा त्यांचा इंग्लंडमधला पहिला सामना आहे. इंग्लिश वातावरणाचा त्यांना बिलकूल अनुभव नाही. इंग्लंडच्या खेळपट्ट्या बदलल्या आहेत असं आपण म्हणत असलो. तरी त्यांच्या वाट्याला काही जुन्या खेळपट्टय़ांशी रक्तगट जुळणार्‍या खेळपट्ट्या आल्या. त्यांची ताकद त्यांच्या फिरकी गोलंदाजीत आहे. ती या खेळपट्टय़ांनी कमी केली. आंतरराष्ट्रीय गोलंदाजीसमोर त्यांची फलंदाजी कमी पडते.

लिओ टॉलस्टॉयचं एक चांगलं वाक्य आहे. तो म्हणतो ”Each unhappy Family is unhappy in its own way.” त्यांच्या कुटुंबाचं दुःखही वेगळं आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या बोर्डाच्या प्रमुख अधिकार्‍याला आणि कर्णधाराला डच्चू दिला. क्रिकेटच्या बुटातल्या खेळाडूपेक्षा सुटाबुटातल्या बोर्डाच्या पदाधिकार्‍यांची दादागिरी वाढली. हिंदुस्थानी उपखंडातल्या क्रिकेटला हा शापच आहे. तो त्यांना भोवतोय. त्यांच्या संघात एक हमीद हसन आहे. तीन वर्षे झाली होती त्याला खेळणं सोडून. तो कॉमेंट्री करत होता. या वर्ल्ड कपसाठी त्याला कॉमेंट्री बॉक्समधून बोलावलं गेलं. म्हणूनच म्हटलं, त्यांचं दुःख वेगळं आहे. अफगाणिस्तान क्रिकेटपटूंनी कदाचित डॉ. झाकीर हुसेन यांची ‘अबू खां की बकरी’ ही कथा वाचली नसेल. अबू खां हा शेतकरी बकरी पाळतो आणि यथावकाश एक वाघ येऊन ती खाऊन टाकतो. एक बकरी वाघाला रात्रभर टक्कर देऊन मरते. तेव्हा झाडावरचे कावळे म्हणतात, ‘‘बकरी हरली.’’ एक म्हातारा कावळा म्हणतो, ‘‘अबू खां की बकरी जीत गयी.’’ अफगाणिस्तान संघाने किमान अबू खां की बकरी व्हावं.

[email protected]