
सामना ऑनलाईन । धुळे
शहरातील मालेगाव रोडलगत असलेल्या अग्रवाल नगरात दोघांच्या डोळय़ांत मिरचीची पूड फेकून त्यांच्याकडील 4 लाख 60 हजार रुपये आणि अॅक्टिवा पळवून नेणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील तीन अल्पवयीन आहेत. संशयितांकडून 4 लाख 60 हजारांपैकी 3 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
शहरातील अग्रवाल नगरमध्ये 1 जूनला रात्री 8 च्या सुमारास अॅक्टिवाने घरी जात असलेल्या शैलेशकुमार चौधरी आणि कांतीलाल चौधरी यांना तीन तरुणांनी अडविले. त्यांच्या डोळय़ात मिरचीची पूड फेकली आणि त्यांच्याकडे असलेले 4 लाख 60 हजार रुपये तसेच त्यांच्याकडे असलेली अॅक्टिवादेखील पळवुन नेली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वात तपास पथक गठीत करण्यात आले. तीन आठवडय़ांच्या आत या पथकाने लुटमार करणाऱ्यांचा शोध लावला. संशयित शंकर बाळकिशन रेड्डी, रितिक ऊर्फ दादू राजेंद्र राजपूत, मयूर ऊर्फ बबवा सुरेश कंढारे, नीलेश संजय गांगुर्डे आणि अनिल बाळकिशन रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रत्यक्षात तीन जणांनी गुन्हा केला, पण इतर दोघांनी त्यांना मदत केली.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, घटनेत चौधरी यांच्याकडील रोख 4 लाख 60 हजारांची लूट झाली होती. त्यातील 3 लाख 10 हजार रुपये संशयितांनी काढून दिले. तसेच चौधरी यांची अॅक्टिवा पोलिसांच्या स्वाधिन केली आहे. तसेच लुटमार करणाऱ्यांकडून त्यांनी वापरलेली मोटरसायकल, गावठी बनावटीचे पिस्तुल आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 76 हजार 200 रुपये आहे. उपअधीक्षक हिरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात पोलीस निरीक्षक कुबेर चौरे, संगीता राऊत, राजेश इंदवे, पंकज चव्हाण, कबीर शेख, योगेश चव्हाण, संजय कढरे, प्रेमराज पाटील, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, सुशिल शेंडे यांचा समावेश होता.
































































