राष्ट्रवादीत आपापसात राडा, परभणीतल्या पराभवावरून कार्यकर्ते भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp logo

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भलताच जिव्हारी लागला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष विभागवार बैठका घेत आहेत. मुंबईत आज झालेल्या बैठकीत परभणीतील कार्यकर्ते शरद पवारांसमोरच एकमेकांना भिडले. निमित्त झाले ते आलेल्या ‘राजेश विटेकर यांचा पराभव कसा झाला?’ या फेसबुकवरील पोस्टचे. कार्यकर्ते इतके भिडले की त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

शरद पवार रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील चार जिह्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करीत होते. संभाजीनगरची बैठक संपल्यानंतर परभणीची बैठक होणार होती. बाहेर कार्यकर्तेही जमले होते, मात्र ही बैठक होण्याआधीच राजेश विटेकर आणि मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पकार रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील चार जिह्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करीत असताना बाहेर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकारणाच्या वादातून गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. ‘राजेश विटेकर यांचा पराभव कसा झाला?’ ही पोस्ट सोशल मीडियावर कोणी टाकली यावरून सुरू झालेली वादावादी चांगलीच पेटली. अखेर हे सोडविण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पण तरीही वादावादी शांत होत नसल्याने जादा कुमक मागवावी लागली. कार्यकर्त्यांची पांगापांग झाली, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

लोकसभेतील पराभवावरून तसेच अन्य कारणांवरून राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. माढ्याच्या उमेदवारीवरून सुरू झालेली ही धुसफूस अद्यापही सुरूच आहे. नीरा पाण्यावरून सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातही जाहीर वाद झाला. हा वाद मिटविण्याच्या वेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वाद उफाळताना दिसून येत आहे. आज परभणीत झालेल्या वादामुळे ही धुसफूस अधिक चर्चेत आली आहे.