मोदी त्सुनामीत सगळे वाहून गेले, आम्ही वाचलो!- सलमान खुर्शीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपटलेले काँग्रेसचे नेते आता मोदींची थोरवी मान्य करत आहेत. देशात मोदी त्सुनामी आली त्यात सगळेच वाहून गेले, सुदैवाने आम्ही जिवंत राहिलो व बोलत आहोत असे स्पष्ट करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला दाद दिली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतक्या मोठय़ा प्रमाणावर होती की निवडणूक लढवण्यासाठी कोणताही विरोधी नेता वा पक्ष पात्र नव्हता. तुम्ही याला त्सुनामी बोलू शकता. यात सगळेच वाहून गेले अशी प्रतिक्रिया खुर्शीद यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. देशातील मोदी लाट काँग्रेसच्या एकाही नेत्याने मान्य केली नव्हती, मात्र खुर्शीद यांना मोदींची लोकप्रियता मान्य करण्याशिवाय राहवले नाही. जर मी मोदींची लोकप्रियता स्वीकारण्यास नकार दिला तर ते निवडणूक नाकारण्यासारखेच होईल असे ते म्हणाले.

राहुलना राजीनामा मागे घेण्याची विनंती
काँग्रेस अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्याचे धाडस होत नसलेल्या राहुल गांधी यांना खुर्शीद यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली, मात्र दारुण पराभवामुळे खचलेले राहुल ही विनंती मान्य करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.