वैजनाथ ते योगेश्वरी देवस्थानाला जोडणाऱ्या रस्ताच्या कामाची दुसरी निविदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे जोतिर्लिंग असलेले परळीचे वैजनाथ आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेले अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर यांना जोडणाऱ्या परळी-पिंपळा (अंबाजोगाई) या महत्त्वपूर्ण 18.3 कि.मी.च्या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा निविदा काढण्याची नामुष्की ओढवली आहे. 1 जूनला या कामासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून 120 कोटी रुपयांच्या कामासाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत.

लातूर येथे असलेल्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या 28 पैकी 27 कामे 90 टक्के पूर्ण झाले. तर परळी-पिंपळा असलेले फक्त 18.3 कि.मी. चा रस्ता मात्र जवळपास तीन वर्षे होऊनही पूर्ण झालाच नाही. या कामाच्या नवीन निविदा 25 जुलैला उघडणार आहेत. निविदा निघाली असली तरी ती मंजूर होणे, वर्क ऑर्डर निघणे आणि प्रत्यक्ष काम सुरु होऊन ते पुर्ण होणे यासाठी सुमारे 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कोकण भवन नवी मुंबईच्या वतीने परळी-अंबाजोगाई या एन.एच. 548 ब मार्गाच्या कामासाठी पुन्हा दुसर्‍यांदा निविदा मागविण्यात आली आहे. मागील दोन वर्षापासून या रस्त्याचे काम चालू असून मुख्य कंत्राटदारासह इतर सहा सहकंत्राटदारांनी या कामात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या कारणांनी या रस्त्याचे काम रखडल्यानंतर पूर्वीची निविदा रद्द करुन नव्याने निविदा काढावी लागली. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष बाब म्हणून परळी-अंबाजोगाई रस्ता राष्ट्रीय महामार्गाशी जोडला होता. केंद्राने राष्ट्रीय महामार्ग 548 ब ला जोड देत या रस्त्याचे काम सुरु केले होते.रस्ता मंजूर केल्यानंतर कामही सुरु झाले होते. परंतु वेगवेगळ्या कंत्राटदारातील अंतर्गत मतभेद, तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याचे काम रखडले होते. आता नव्याने मंजूरी मिळाल्याने साधारणपणे दोन महिन्यात या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षीत आहे.

या रस्त्यावर चालणेसुद्धा अवघड असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर किमान या रस्त्याचे मजबुतीकरण करुन नागरिकांना सुरक्षा प्रदान करणे गरजेचे होते. पावसाळ्यात या रस्त्यावर अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. शुक्रवारी पडलेल्या पावसाने या रस्त्यावर अनेक दुचाकी चालक घसरून पडले आहेत. याआधीही या रस्त्यावर बरेच अपघात झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वी या रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत या रस्त्यावरील नागरिकांनी आंदोलन केले मात्र 80 च्या जवळपास आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे म्हणजे आमच्यावर केलेला अन्याय असल्याचे भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख अतुल दुबे यांनी म्हटले आहे. हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.