गोवा मुक्ती लढयातील अग्रणी स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांचे पुण्यात निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोवा मुक्ति लढयातील अग्रणी स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादारम्यानच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

रानडे यांच्या निधना बद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, रानडे यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे.रानडे हे निडर स्वातंत्र्य सैनिक होते.गोवा मुक्ती लढयात त्यांनी दिलेले योगदान आणि त्याग गोमंतकीय जनता कधीच विसरु शकणार नाही.

दरम्यान कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी देखील दुःख व्यक्त करतानाच रानडे यांच्यावर कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्यान फोंडा येथील तळावलीकर यांनी रानडे यांच्यावर बनवलेला माहितीपट राज्यातील सगळ्या शाळांमध्ये दाखवून रानडे यांचे कार्य नव्या पीढी समोर ठेवले जाईल,असे स्पष्ट केले आहे.

मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते ही रानडे यांची महत्त्वाची ओळख आहे. रानडे यांना पोर्तुगालात 26 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. रानडे यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. बेती येथील पोलिस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आणि १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली.त्यांतर त्यांची रवानगी पोर्तुगालमधील लिस्बन येथे केली. १९६२ मध्ये केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईनंतर ४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त झाला.

रानडे यांच्या सुटकेसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठविला होता. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांनी पोप पॉल यांची व्हॅटिकन सिटीत भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. पोपनी हस्तक्षेप केल्यानंतर रानडे यांची सुटका झाली होती.

रानडे यांचे गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तसेच ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल केंद्र सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित त्यांना केले होते.