मराठी अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

एका मराठी अभिनेत्रीला सोशल मीडियावरून शिवीगाळ करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. सतीश पाटील असे त्याचे नाव असून त्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीने काही दिवसांपू्र्वी ‘फिट्स’ या आजाराशी संबंधित व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हि़डीओत ही अभिनेत्री हिंदीतून बोलत होती. मराठी असून हिंदीत बोलत असल्याने अनेकांनी तिला फेसबुकवरून प्रचंड शिव्या दिल्या होत्या. काहीजणांनी तिच्यावर अत्यंत हीन पातळीवर जाऊन टीका केली.

ट्रोल करणाऱ्यांनी अश्लील भाषा वापरल्याने या अभिनेत्रीने दुसरा व्हीडिओ चित्रीत केला होता ज्यात तिने शिवीगाळ करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. या अभिनेत्रीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अश्लील भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीची पोस्ट आणि तिला आलेल्या प्रतिक्रिया तपासल्या होत्या. तिला आलेले मेल देखील पोलिसांनी तपासले. संभाजीनगर येथील सतीश पाटील नावाच्या व्यक्तीकडून अभिनेत्रीला आक्षेपार्ह भाषेत मेसेज अनेकदा आल्याचे तपासात पोलिसांना निदर्सशनास आले आहे. पोलिसांनी त्याचा पत्ता शोधून काढला व त्याला संभाजीनगर येथून अटक केली.