
सामना प्रतिनिधी । नगर
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत नगर जिल्हा परिषद कायमच आघाडीवर राहिली आहे. स्वच्छतेच्या कार्यातही जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळेच राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला नगर जिल्हा शौचालययुक्त करून हागणदारीमुक्तीच्या कार्यात जिल्हा परिषदेने अव्वल स्थान पटकावले आहे.
कुटुंबाच्या, गावाच्या आरोग्यासाठी घर, परिसर तसेच गावातील सार्वजनिक स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. नगर जिल्हा परिषदेने यासाठी केलेले कार्य आषाढी वारीत सहभागी होणार्या स्वच्छता रथाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहचणार आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळून ते नगर जिल्हा परिषदेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करतील व अनुकरण करतील, असा विश्वास जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी व्यक्त केला.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेनिमित्त नगर ते पंढरपूर पालखी सोहळा आणि स्वच्छता रथ रवाना करण्यात आला आहे. या रथाला जि.प.अध्यक्षा विखे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, डॉ तेजश्री लंघे, सुनिता भांगरे, सुष्मा दराडे, ताराबाई पंधरकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सुभाष कराळे, वैशाली खेडकर, अमित भालेराव, प्रशांत जगताप, सचिन वाघ, मनोज सकट, भागवत गोल्हार, दिपाली जाधव, सचिन थोरात, किशोर म्हस्के, राहुल झिने, अश्विनी ठुबे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी माने म्हणाले की, शासनाच्या स्वच्छता मिशनअंतर्गत नगर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट काम करीत ग्रामीण भागात प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हागणदारीमुक्तीचा हा पहिला टप्पा असून आता या शौचालयांच्या नियमित वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत आषाढी वारीतही स्वच्छतेच्या सवयींबाबत प्रबोधन व्हावे, नगर जिल्हा परिषदेचे काम सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी हा स्वच्छता रथाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपाध्यक्ष राजश्री घुले म्हनाल्या की, नगर जिल्ह्याने राज्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले. स्वच्छतेच्याबाबतीत आदर्शवत कामे जिल्हा परिषदेने नेहमीच केली आहेत. स्वच्छता रथाच्या माध्यमातून आषाढी वारीनिमित्त एकत्र येणार्या ग्रामीण भागातील वारकर्यापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचवण्यात येणार आहे. यातून एक चांगले प्रबोधन होवून स्वच्छतेचा व आरोग्याचा कृतीयुक्त संदेश सर्वांना प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या स्वच्छता रथाबाबत माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी सांगितले की, नगर जिल्हा परिषदेची पालखी व स्वच्छता रथ 15 दिवस आषाढी वारीत प्रबोधनाचा जागर करणार आहे. या रथासमवेत कलापथकही असून ते गावागावात जावून सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयांचा वापर, परिसर स्वच्छता याबाबत प्रबोधन करणार आहे. नगर जिल्हा परिषदेमार्फत होत असलेले कामही यानिमित्त सर्वांसमोर येणार आहे. स्वच्छता रथावर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावण्यात आले असून प्रबोधनात्मक गाण्यांव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.




























































