
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे आणि धामापूर खाडी पट्ट्यात सक्षन पंपाने सुरु असणाऱ्या बेकायदा वाळू उपशाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रुप घेत असून येथून आजवर हजारो ब्रास वाळू परजिल्ह्यात रवाना झाली आहे. हातपाटीची परवानगी घेऊन बेधडक सक्षन पंप लावून हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करतांना शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. या बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूकीकडे महसूलसह संगमेश्वर पोलीसही दुर्लक्ष करीत असल्याने याबाबतची लेखी तक्रार आपण महसूल आणि पर्यावरण मंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि प्रांत स्वतः येऊन कारवाई करतात मात्र दुसऱ्या दिवशी लगेचच रात्रीच्यावेळी बिनधास्तपणे सक्षन पंप लावून बेकायदा वाळू उपसा सुरु होतो या गंभीर गोष्टीकडे आपण मंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे भायजे यांनी स्पष्ट केले.
बेकायदा वाळू उपसा आणि अधिक क्षमतेने होणारी वाळूची वाहतूक यामुळे खाडी किनाऱ्या लगतची जमीन ढासळत असून गावागावातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. आधीच रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी निधी मिळत नाही आणि त्यातच वाळूच्या ओव्हरलोड वाहतूकीमुळे करजुवे भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. करजुवे आणि धामापूर या खाडी भागात रात्रीच्या वेळी सक्षन पंपाने वाळू उपसा होतो. ही वाळू घेऊन परजिल्ह्यातील ट्रक संगमेश्वर देवरुख मार्गे जातात. मग या बेकायदा वाळू वाहतूकीवर संगमेश्वर पोलीस आणि महसूल विभाग दंडात्मक कारवाई करुन वाळू आणि वाहने जप्त का करीत नाही ? असा सवाल करुन या कारवाईसाठी आपण जिलाधिकारी सुनील चव्हाण आणि प्रांताधिकारी अमित शेंडगे यांची तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांची भेट घेणार असल्याचेही भायजे यांनी सांगितले .
करजूवे येथील बेकायदा वाळू उपशाबाबत आजवर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी रत्नागिरी येथून येवून कारवाई केली याचे आपण अभिनंदन करतो. या कारवाई नंतर बेकायदा वाळू उपसा सुरु राहिल्याने प्रांताधिकाऱ्यांनी करजुवे धामापूर परिसरात १४४ कलम लागू केले. मात्र या कलमाचाही कोणताच उपयोग न होता दिवसाला शेकडो ब्रास वाळू उपसा सुरुच आहे. ज्या विभागाच्या अखत्यारीत हा विषय येतो तो खनीकर्म विभाग आणि या विभागाचे अधिकारी नक्की काय काम करतात हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. आजवर करजुवे परिसरात बेकायदा वाळू उपशावर दोन – तीन वेळा कारवाई करण्यात आली मात्र प्रत्येक वेळी धामापूर् येथील सक्षन पंपावर एकदाही कारवाई न झाल्याने या व्यावसायिकाला कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महसूल विभागाच्या आणि खनीकर्म विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धामापूर् येथे प्रत्यक्ष पाहणी केल्यास येथे वाळूचा हजारो ब्रास चाळ पडलेला दिसून येइल असे परिसरातील ग्रामस्थांनी स्पष्ट केले . सध्या अधिवेशन सुरु असल्याने करजुवे आणि धामापूर येथील ग्रामस्थांनी शासनाच्या ‘ आपले सरकार ‘ या पोर्टलवरही बेकायदा वाळू उपशाबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे सांगितले. संगमेश्वर तालुक्यातून सुरु असणारी बेकायदा वाळू वाहतूक न थांबल्यास संगमेश्वर सोनवी पूल येथे जन आंदोलन करण्याची तयारी पर्यावरण प्रेमींनी सुरु केली आहे.





























































