
>> वरद चव्हाण
नृत्य, योग, चालणे. विविध मार्गानी भार्गवी सुडौल राहते. शिवाय जोडीला संतुलित आहार आहेच.
नमस्कार, फिटनेस फ्रीक्स! आजचा फिटनेस लेख एका अशा अभिनेत्रीवर आहे, जिने आपल्या अभिनयाने व नृत्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर केलं. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ लूकमुळे ती घराघरात पोहोचली. नुसता अभिनयच नव्हे, तर ‘सेलिब्रिटी एकापेक्षा एक’ जिंकून टोटल पॅकेज म्हणून तिनं स्वतःला सिद्ध केले. आपली लाडकी भार्गवी चिरमुले.
खरं तर नृत्याची आवड भार्गवीला लहानपणापासूनच होती. भरतनाटय़म या नृत्य प्रकारात तिनं शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं आहे. नृत्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोच होतो, पण त्याचबरोबर आपलं बॉडी पोश्चरसुद्धा चांगलं होतं. याशिवाय सदाशिव निंबाळकरांच्या योग विद्या निकेतनमधून तिने योगाचा नुसता डिप्लोमाच (डिप्लोमा) केला नाही, तर याच संस्थेत तिने एका वर्षासाठी नोकरी करून इतरांना योगाचे धडेसुद्धा दिले आहेत. योगामुळेच ती मानसिकदृष्टय़ा खूपच स्ट्राँग झाली. याशिवाय योगामुळेच तिचा स्टॅमिना फार वाढला. हाच स्टॅमिना तिला 12-14 तासांच्या शूटमध्ये किंवा 5-8 मिनिटांच्या नृत्यामध्ये खूप उपयोगी पडला. भार्गवीला सर्दी, खोकल्याचा सतत त्रास होत होता आणि म्हणूनच तिने योगासनाला सुरुवात केली. योगामुळेच तिचा हा आजार कायमचा दूर झाला. आज आपल्यापैकी अनेकांना प्रदूषण, धूळमातीची ऍलर्जी असते व या ऍलर्जीचं रूपांतर सर्दीमध्ये होत असेल तर तुम्ही भार्गवीचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवा आणि लगेच योगाला सुरुवात केरा. ज्या मालिकेमुळे भार्गवी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली, ती मालिका म्हणजेच ‘वहिनीसाहेब’. या मालिकेच्या शूटदरम्यान मात्र भार्गवीच्या वजनात थोडा फरक नक्कीच पडला. अति व्यस्त रुटिन, नीट झोप न मिळणं, जेवणाच्या वेळा चुकणं, वजन वाढायला ही कारणं पुरेशी असतात आणि म्हणूनच भार्गवीने पुन्हा योगाचा आधार घेतला आणि मग ‘एकापेक्षा एक’ सुरू झाला आणि नाचामुळे वजन कमी व्हायला सुरुवात झाली आणि मग आपण सतत काहीतरी फिजिकल ऑक्टिव्हिटीज केल्याच पाहिजेत असा तिने निश्चय केला आणि म्हणूनच काही काळासाठी तिने पिलाटेसचासुद्धा कोर्स केला.
पिलाटेस या व्यायामामुळे आपलं पोट कमी होतं. याशिवाय जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर तोसुद्धा या व्यायामामुळे कमी होतो. याचबरोबर रोज नियमितपणे 30 मिनिटे चालणं गरजेचे आहे असं भार्गवीला वाटतं. जीममध्ये जाऊन व्यायाम करणं तिला जरा कठीण जातं. कारण तिला गुडघेदुखीचा त्रास आहे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आपण शिकत राहायला हवेत, जेणेकरून आपल्याला एकाच प्रकारच्या व्यायामाचा कंटाळा येणार नाही आणि नवीन व्यायाम शिकायच्या उत्सुकतेने आपण व्यायाम करत राहू असं तिचं ठाम मत आहे. गेली कितीतरी वर्षे भार्गवीने स्वतःचं वजन कंट्रोलमध्ये ठेवले आहे. याचं श्रेय ती तिची डाएटिशियन रिया अंकोलाला देते. भार्गवी शुद्ध शाकाहारी आहे. डाएटमध्ये तुमचं टायमिंग म्हणजेच तुम्ही किती वाजता खाता याला खूप महत्त्व आहे. भार्गवी मालिकेचा शूट असो किंवा नाटकाचा प्रयोग असो, स्वतःचे डबे स्वतःच कॅरी करते. भार्गवी पोळी अजिबात खात नाही. पोळीऐवजी भाकरी खाते. ज्वारीची, तांदळाची, कुठलीही. आठवडय़ातून एकदा दुधीची भाजी, एकदा शेवग्याच्या शेंगा आणि एकदा सुरण हा आहार कम्पल्सरी आहे. बाकी पालेभाज्या असतातच. भात जर खायचा असेल तर लाल तांदळाचा असतो. लाल तांदूळ म्हणजेच हातसडीचा लाल तांदूळ. हा तांदूळ ती कूकरमध्ये शिजवत नाही. सगळ्या प्रकारची फळं खायला आवडतात. आता ती दीक्षित डाएटसुद्धा फॉलो करत आहे. दिवसातून एक-दोन कप विदाऊट शुगर चहा. साखर अगदीच वर्जित केला आहे असं नाही. कधी वाटलंच तर खूप कमी प्रमाणात साखर घेते. संध्याकाळी चहाच्या वेळेस प्रत्येकाला काही ना काही खावंसं वाटतं त्या वेळी भार्गवीच्या आहार तज्ञांनी तिला चणे, मखाणो खाण्याचा सल्ला दिला आहे. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येत असेल तर स्वतःच्या आहारावर लक्ष द्या. फक्त एकच लक्षात ठेवा. काहीही झालं तरी स्वस्थ बसून राहू नका.




























































