
>> विद्या कुलकर्णी
चित्रातला चित्तुर… मुक्त अवकाशापेक्षा त्याला जमीन प्यारी
फोटोग्राफी करावयास लागल्यापासून मला हिमालयातील नैसर्गिक सौंदर्य, त्यातील विविधता व अनेक सुंदर पक्ष्यांचे वास्तव्य खुणावू लागले. त्यानिमित्ताने मी राजाजी जंगल, चोपटा परिसर व सत्तालमध्ये हिंडू लागले. सत्तालमध्ये अनेक सुंदर सुंदर पक्षी पाहावयास मिळाले, परंतु तांबूस तपकिरी गळ्याच्या चित्तूर पक्ष्याने दर्शन दिले नव्हते. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. संध्याकाळ होऊ लागली, निराशाच पदरी पडणार असे वाटत असतानाच चित्तूर पक्ष्याने लगबगीने अतिशय तोऱयात चालत येऊन आमच्या डोळ्याचे पारणे फेडले. क्षणात आम्ही सर्वजण सुखावून गेलो. चित्तूर पक्ष्याचा तोरा, त्याचे सौंदर्य काही खासच! पंचतंत्रातील कथांमध्ये चित्तूर पक्ष्याच्या डौलदार चालीचे वर्णन केलेले आहे. इतर पक्षी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात व फसतात असा उल्लेख आहे. ग्रीक पौराणिक कथेनुसार ‘Daedalus’ अतिशय उत्कृष्ट कलाकार व कारागीर असून तो ज्ञान, शहाणपणा याचे द्योतक होता. आपल्यापेक्षा हुशार असलेल्या भाच्याला रागाच्या भरात अथेना टेकडीवरून फेकून दिले. ते पाहिल्यामुळे भीतीपोटी चित्तूर पक्षी उंच उडत नाही व झाडावर घरटेही बांधत नाही असा समज आहे.
तांबूस तपकिरी गळ्याचा चित्तूर पक्षी हिंदुस्थानातील आणि दक्षिणपूर्व आशियातील पर्वतमय जंगलात आढळतात. हे पक्षी हिमालयात 460 – 2500 मीटर उंचीवर, उत्तराखंडात पूर्वेपासून ते अरुणाचल प्रदेशात आणि उत्तरपूर्व हिंदुस्थानच्या टेकडय़ांमध्ये स्थानिक आहेत. जास्त प्रमाणात मात्र हिमालयात 1450 – 1830 मीटर उंचीवर व उत्तरपूर्व हिंदुस्थानात 600 – 1800 मीटर उंचीवर ते आढळतात. हरित जंगले हे त्यांचे आवडीचे ठिकाण आहे. तांबूस तपकिरी गळ्याच्या चित्तूर पक्ष्याचे रूप विविध रंगी असल्यामुळे खरे तर अवर्णनीयच आहे.
या पक्ष्याचे डोके राखाडी रंगाचे असते व त्यातच शेवाळी – तपकिरी रंगाच्या छटा असून मानेच्या मागील बाजूस काळ्या रंगांचे ठिपके असतात. त्याच्या भुवईवर पांढरा रंग असून त्याला मिश्याप्रमाणे पांढऱया रंगाची वक्ररेषा असते. मान व त्याच्या बाजूचा भाग नारिंगी तांबूस असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. छाती व आजूबाजूचा भाग, पोटाचा वरचा भाग भुरकट निळ्या रंगाचा असून पोटाचा मधला भाग पांढरट असतो. पार्श्वभाग भुरकट तपकिरी असतो. या पक्ष्याचा वरील भाग शेवाळी तपकिरी असतो. त्याच्या पंखांमध्ये तांबूस पिंगट, करडय़ा व काळ्या रंगाचे पट्टे असतात. चोच काळी किंवा धुरकट तपकिरी रंगाची असून पाय गुलाबी किंवा किरमिजी रंगाचे असतात. नर व मादी सारखेच दिसतात. किशोरवयीन पक्ष्याचा खालचा भाग फिक्कट असून त्याच्या डोक्याच्या वरच्या भागावर तपकिरी व काळ्या रंगाची नक्षी असते. हे पक्षी 6 ते 12 च्या संख्येने एकत्र फिरताना आढळतात, परंतु प्रजननाच्या काळात मात्र जोडी-जोडीने फिरतात.
हे पक्षी मुक्तपणे सर्वत्र फिरत असतात, परंतु वृक्षाखालील झाडाझुडुपांत दडून बसल्यावर त्यांना शोधणे कठीण असते. बियाणे, वनस्पतीचे अंकुर, बोरे, कीटक आणि गोगलगाय हे त्यांचे खाद्य आहे. हे पक्षी सामान्यत- जमिनीवर धावताना आढळतात, पण कधीतरी कस्तुर पक्ष्यांप्रमाणे झाडांच्या फांद्यावर पण उडतात. रात्री झाडावर एकमेकांना बिलगून झोपतात. हिंदुस्थानात त्यांच्या प्रजननाचा काळ ‘एप्रिल ते जुलै’ असतो, तर चीनमध्ये ‘फेब्रुवारी ते मे’ असतो. नर बांबूमध्ये किंवा जंगलात अथवा पाण्याच्या साठय़ाच्या कडेला घरटे बांधतो. घरटय़ाला आतून गवताचा थर तयार करतो. मादी एकावेळी 3 – 5 पांढरी अंडी घालते.
या पक्ष्यांची अवैध शिकार केली जाते हे ऐकून मनाला फार हुरहूर वाटली. ‘जीवो जीवस्य भोजनम’ हा जरी जगाचा नियम असला तरीही इतक्या सुंदर पक्ष्याला भक्ष्य बनवणाऱयाच्या मनात क्षणभर तरी चलबिचल होत नसेल का असा विचार माझ्या मनात डोकावून गेला.




























































