धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत सलग दुसर्‍या दिवशी गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhanbhavan

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधान परिषदेत शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. धनगर आरक्षणावरून गुरुवारी विरोधकांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधार्‍यांनी आजही लावून धरली. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोन वेळा अर्ध्या तासासाठी आणि अखेरीस दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

कामकाजाच्या सुरुवातीला अर्धा तास चर्चा आणि त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून अल्पकालीन चर्चा झाली. त्यानंतर नियमित कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांच्या तासांत धनगर आरक्षणाचा तारांकित प्रश्न होता. मात्र सत्ताधारी बाकांवरून गुरुवारी धनगर आरक्षणाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सभागृहाची मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी झाल्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. धनगर समाज आणि मराठा समाज कुणाच्या बापाची जहागीर नाही. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे विधान केले होते. अखेर या गदारोळातच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच 2019-20 च्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडल्या. सभापतींनी सर्व कामकाज गदारोळातच रेटून नेले.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे सत्ताधार्‍यांचा गोंधळ

नियमित कामकाजादरम्यान प्रश्नोत्तरांच्या तासांत धनगर आरक्षणाचा तारांकित प्रश्न होता. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी आज पुन्हा विरोधकांच्या गुरुवारच्या आक्षेपार्ह विधानाचा मुद्दा उपस्थित केला, परंतु मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांकडून मांडला जाणार असल्याने सत्ताधार्‍यांनी विरोधकांकडून माफीचा मुद्दा लावून धरल्याचा आणि कामकाज रोखल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.