
>> डॉ. अरविंद नेरकर
मनामनांची मशागत करण्याचे काम वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपूर्वी केले आहे. महाराष्ट्राच्या लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून देत वारीची परंपरा दिली. आदर्श वारकऱयांच्या जीवनाशी अतूट असा बंध निर्माण करणारी ही पंढरपूरवारी. भागवत विचारसरणीचा आदर्श ठेऊन प्रपंचात राहून परमार्थ आचरणाचा मार्ग वारकरी संप्रदायाने दाखवला. आनंदवारीचा हा सोहळा अवघा महाराष्ट्र अनुभवत आहे.
‘ज्ञानोबा माऊली,
ज्ञानराज माऊली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’
हे शब्द कानावर आले की, दिंडय़ापताका आणि पालखीबरोबर पंढरपुरी मार्गक्रमण करणारे वारकरी नजरेसमोर येतात. टाळमृदुंगाचा गजर करीत, ओव्या, अभंगांची बरसात करीत हे वारकरी आळंदीहून निघून वीस दिवसांनंतर आषाढी एकादशीस पंढरपुरास पोहोचतात. वारकऱयांची संख्या लाखांवर असते आणि या संख्येत दरवर्षी भर पडताना दिसून येते.
पंढरपूरवारी या वैभवसंपन्न परंपरेमागे वारकऱयांची श्रद्धा असून विठ्ठलभक्तीभोवती वारकरी संप्रदायाची गुंफण झाली आहे. वारीचा भक्ती सोहळा म्हणजे भक्तीचा महापूर अशा शब्दांत वर्णन करता येईल.
भक्तीचा मळा फुलविणारा, वेदप्रामाण्य पंरपरा जतन करणारा, संस्कृतीचं संवर्धन करून भेदाभेद विसरायला लावणारा वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांनी चैतन्यमय बनविला. त्यानंतर संतपरंपरा निर्माण झाली आणि या संप्रदायाने जनमानसावरील प्रभाव कायम ठेवला. आजच्या काळातही सांप्रदायिक मंडळी मोठय़ा भक्तिभावानं संतवचनाचं स्मरण आणि आचरण करीत असतात. श्रीसंत ज्ञानेश्वरांच्या अवतारकार्याला सातशे वर्षे होऊन गेलीत तरीदेखील ज्ञानेश्वर माऊलींनी स्थापलेल्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव जनमानसावर कमी न होता वाढतच आहे. वारी सोहळय़ाचं भव्य स्वरूप हे तर जागतिक पातळीवर कौतुकाचा आणि प्रशंसेचा विषय ठरला आहे.
ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या भक्तिपंथाचा पुरस्कार केला. या भक्तिप्रेमाच्या पंथामध्ये ते पूर्ण समरस झाले. पूर्वापार चालत आलेल्या या भक्तिपंथात त्यांनी नवीन आशय ओतला. तो सोपा, सुटसुटीत, अधिक सखोल आणि व्यापक केला. पंढरीच्या भक्तिकेंद्राला नवतेज प्राप्त झालं. पंढरीच्या वारीला प्रेमळांच्या स्नेहसंमेलनाचं स्वरूप आलं. या संमेलनाचा आनंद कर्मकांडविरहित आचरणातून ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः लुटला आणि लुटविला.
माझ्या जीवीची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी।
पांडुरंगी मन रंगले।
असं ज्ञानदेवांनी पंढरीच्या वारकऱयांचं कौतुकानं वर्णन केलं आहे. ज्ञानदेवांनी केलेल्या या वर्णनावरून त्या काळामध्ये वारीला येणाऱया, नाचत-बागडत भजनात रंगणाऱया, टाळचिपळय़ा यांच्या नादात विठ्ठलनामात तल्लीन होणाऱया वारकऱयांचं दृश्य नजरेसमोर उभं राहतं. ज्ञानदेवांच्या काळी पंढरपूर हे लहान खेडं म्हणजे पल्ली राहिले नसून होयसळ शिलालेखाप्रमाणे महाग्राम झालं होतं.
वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याची ज्ञानदेवांची कामगिरी चतुर्विध स्वरूपाची आहे. ही कामगिरी म्हणजे सुसंगत तर्कशुद्ध तत्त्वज्ञान, सूक्ष्म नीतिमीमांसा, धार्मिक अनुभवाचं मूल्यमापन आणि लोकजागृती करून तयार केलेली प्रवाही संघटना अशा चोहोबाजूंनी भरभक्कम पायावर उभारणी होय.
नीती, तर्कशुद्धता, धार्मिक अनुभव या सामर्थ्यावर लोकजागृती करून ज्ञानेश्वरांनी सामूहिक शक्ती उभी केली.
पंढरीची वारी देवाची आणि आळंदीची संतांची वारी. या दोन्ही वाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या मानल्या जातात. वारीचं व्रत सांभाळण्याच्या काळात काही वेळा या अडचणीच्या आणि कसोटीच्या असल्या तरी निष्ठावंत वारकरी प्राणपणानं हे व्रत सांभाळतो.
ही माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।
पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी।।
अशी कळकळीची प्रार्थना एका अभंगात आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा पंढरीच्या चार प्रमुख वाऱ्या असून लाखो भाविकांची, विशेषतः आषाढी, कार्तिकी वारीस मांदियाळी असते.
बहुसंख्य वारकरी पंढरीस आषाढी एकादशीस जमतात. त्यासाठी देहू-आळंदी येथून निघणाऱया पालखीबरोबर पायी वारी करीत पंढरपूर येथे येतात. वारी-मग ती आषाढी असो वा कार्तिकी असो- वारीक्रताचं आयुष्यभर अखंड आचरण करतात. वारी करण्यामुळे अनेक लाभ पदरी पडतात. निष्ठा बळकट होते. अंतरीचं प्रेम वाढतं. संतसज्जनांच्या गाठीभेटी होतात. वारी म्हणजे उच्च पातळीवरील स्नेहसंमेलन होय. भक्तिप्रेमसुखाची अनुभूती म्हणजे वारी असं वर्णन करता येईल.
पंढरपूर वारीच्या वेळी प्रत्येक दिंडीत एक वीणाधारी आणि एक मृदुंगवादक असतो. पालखी रस्त्याने चालताना प्रत्येक दिंडीत टाळ-मृदुंगाच्या साथीवर भजन चालू असते. या भजनातील अभंग गायनातूनच वारकऱयांचा हा गायनी वारसा एका पिढीतून दुसऱया पिढीकडे, दुसरीकडून आणखी पुढच्या पिढीकडे असा पंरपरेने संक्रमित होत असतो. संप्रदायाचे तत्त्वज्ञान वारकऱयांना मुखोद्गत होते. गानगुणांमुळे मनावर ठसते. पालखी चालत असताना सकाळी, दुपारी असं दोनदा भजन होते. रात्री पालखी ठेवण्यासाठी जो तंबू उभारतात त्याच्या समोर सर्व वारकरी जमून ‘ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष करतात. प्रथम गायनाची संथ लय असते आणि नंतर ती वाढत वाढत द्रुत होते. शेवटी अतिद्रुत, नंतर आरती होऊन भजनसत्र संपते. वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा भक्ती सोहळा आहे. श्री ज्ञानदेवाच्या आणि इतर वारकरी संतांच्या ठिकठिकाणाहून येणाऱया पालख्यांच्या सहभागातून पालखी सोहळा भव्यदिव्य होतो.
देहूहून निघालेला श्री संत तुकाराम पालखी सोहळा आणि आळंदीहून निघालेला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोहळा तसेच पालखीबरोबर येणारा भक्त समुदाय हा नुसता जमा झालेला गर्दी समुदाय नसून तो एकाच भावनावलयाने गुंफलेला सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध समाज असतो. भिन्न व्यक्ती प्रेम, भक्ती भावनेने एकत्र येऊन वाटचाल करतात. ही वाटचाल केवळ भक्तिमार्गाची वाट नसून सुखसमाधानाचा राजमार्ग असल्याचे अनुभवाला येते.
ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदी येथे होणाऱया आळंदी-पंढरपूर पालखी प्रस्थानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून वारकरी येतात. अवघी आळंदी भक्तिमय वातावरणाने भारावून जाते. दिंडय़ा-पताका आणि वारकऱयांच्या लगबगीने आणि टाळ-मृदुंगाच्या आवाजात ज्ञानेश्वर – तुकारामांच्या नामाचा गजर ऐकू येतो. कदाचित पावसाची एखादी सर आली, तर भक्तिभावाने जमलेल्या या जनसागराचे पावसाने भिजण्याकडे लक्ष नसते. प्रस्थान सोहळा नजरेत साठवावा म्हणून अंतःकरणाची घलमेल सुरू होते.
संतकृपा झाली। इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर। तेथे रचिले ते आवार
जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत
तुका झालासे कळस।भजन करा सावकाश
बहिणी म्हणे फडकती ध्वज।
निरुपणा केले बोजा।।
संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाचं कार्य या अभंगातून सांगितलं आहे. संतकृपा झाली आणि इमारत फळा आली हे सांगताना ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची तात्त्विक पायाभरणी केली आणि संत नामदेव, संत एकनाथांनी भरभक्कम बांधणी केलेल्या या भागवतधर्म मंदिराचे संत तुकाराम कळस ठरल्याचं बहिणाबाई कृतज्ञापूर्वक सांगतात. वारकरी संप्रदायाच्या संतांनी अखंडपणे केलेल्या कार्याची जाणीव वाखरी येथे जमलेल्या आठ-दहा लाख भाविकांच्या मेळय़ामुळे जाणवते. पुढे पंढरपूरला आषाढी एकादशीस भाविक भक्तांच्या संख्येत वाढ होऊन भक्ती सोहळय़ाचं विराट रूप पाहून श्रद्धेने मन फुलून येतं.
पंढरपूरवारी हा भक्तीचा अनुभव आणि आनंददायी सोहळा असला तरी पायी वारी करताना बरेच श्रम पडतात. आळंदी-पंढरपूर असो वा देहू-पंढरपूर असो, पायी प्रवास अर्थात दीर्घ पल्ल्याचा प्रवास आणि रोज सरासरी पंधरा-वीस किलोमीटर चालावयाचे आणि तेदेखील ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता चालावयाचे. त्यामुळे कष्ट पडणे स्वाभाविक आहे. मात्र कितीही त्रास झाला तरी आणि कष्ट झाले तरी माऊली आपल्याला पंढरपूरला घेऊन जाते अशी वारकऱयांची श्रद्धा असल्याने विशेष थकवा वाटत नाही. श्रद्धेचं बळ किती मोठं आहे याची प्रचीती वारीमध्ये पदोपदी येते.
(लेखक संतसाहित्याचे अभ्यासक आहेत)




























































