
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
सलग तिसर्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहीला आहे. तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणचा परिसर जलमय झाला आहे. जिल्ह्यातील काही धरणे तुडूंब भरुन वाहत आहेत.
दापोली तालुक्यातील पंचनदीवरील धरण, रत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण, राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण, मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरण ओव्हरफलो होऊन वाहत आहेत. जिल्ह्यातील नद्यांची पातळी वाढली असून पावसाचा जोर कायम आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. राजापूर आणि मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1012 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी पाऊस 112.74 मिमी पडला. त्यामध्ये मंडणगड 172 मिमी, दापोली 60 मिमी, खेड 85 मिमी, गुहागर 100 मिमी, चिपळूण 147 मिमी, संगमेश्वर 88 मिमी, रत्नागिरी 86 मिमी, लांजा 82 मिमी, राजापूर तालुक्यात 192 मिमी इतका पाऊस पडला. दापोली तालुक्यातील कळंवाट येथील कृष्णा हरी हिमन यांच्या घराचे पावसामुळे 17 हजार 430 रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील साटव येथील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. चिपळूण येथील याकूबा मुकादम यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली कूडप येथे सरस्वती चौधरी यांच्या घराचे नुकसान, डेरवण येथील जि. प. शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान, बौध्दवाडी येथील आजम पठान यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली.



























































