जोगेश्वरीत एकाच वेळी चोरट्यांची पाच ठिकाणी घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जोगेश्वरी येथील एकाच विभागातील पाच घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. पण, या चोरांचं दुर्दैव असं की पाच घरांमध्ये चोरी करूनही त्यांच्या हाती काही मौल्यवान वस्तू लागली नाही.

घरफोडी करणाऱ्या टोळीत पाच ते सहा जण असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. जोगेश्वरी पूर्व येथे राम नारायण यादव नावाची ही बैठी चाळ आहे. या चाळीतील काही घर ही दुमजली स्वरुपाची आहेत. या दुमजली घरांमधील बहुतांश कुटुंबे ही वरच्या मजल्यावर झोपतात. घरफोडी करणाऱ्या टोळीने ही बाब हेरली होती. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास या टोळीने पाच दुमजली घरांमध्ये घुसत चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास सर्वच घरांमध्ये काहीही मौल्यवान वस्तू त्यांना चोरता आली नाही. यातील एका बंद घराचे कुलूप तोडण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्यांनी केला. पण, त्यांच्या हातात काहीही लागलं नाही.

ही घटना सकाळी चाळकऱ्यांना जाग आल्यानंतर उघडकीला आली. घरातील सामान अस्ताव्यस्त पसरल्याचं पाहून चाळीतील रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशा प्रकारे चोरी झाल्याने परिसरातील रहिवासी धास्तावले आहेत.