
सामना ऑनलाईन । नाशिक
नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला असून उद्यापासून चार विभागात एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे तर दर गुरुवारी कोरडा दिन पाळला जाणार आहे. नाशिक शहरासाठी पाण्याची कमी नाही तब्बल पाच धरणातून पाणी उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर आताही धरणात सुमारे तीनशे दश लक्ष घन फूट पाणी साठाही शिल्लक आहे परंतु तरीही नाशिककरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.
शहरावर घोंगावणाया जलसंकटातून सुटका करण्यासाठी अखेरीस पाणीकपातीचा कटू निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही त्यातच पावसाने ओढ दिली आहे, अशा स्थितीत पाण्याचा उपसा करणे कठीण होत आहे. महापालिकेने धरणात चर खोदून सखल भागातील दोन मीटर निम्न पातळीवरील पाणी उचलण्याची तयारीदेखील केली आहे. तथापि, सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. मुकणे धरणात उपयुक्त जलसाठा अवघा दहा दशलक्ष घनफूट इतका आहे.
महापालिकेने सर्व प्रकारचे जलतरण तलाव बंद केले असून, महापालिकेच्या उद्यानात कूपनलिकेद्वारे पाणी दिले जाणार आहे. अर्थात, शहरात पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा वापर अपवादात्मक स्थितीतच करावा लागणार आहे. खासगी सर्व बांधकामांना महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून, बाटलीबंद किंवा जारमधून पाणीपुरवठा करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांनादेखील पाणी वापर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चार विभागांत एक वेळ पाणी
महापालिकेच्या सहा विभागांपैकी सिडको आणि सातपूर या दोन विभागांतच सध्या एकवेळ पाणीपुरवठा होतो. पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, पंचवटी आणि नाशिकरोड या चारच विभागांत दोन वेळ पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे या चार विभागांतच एक वेळ पाणीपुरवठा होईल. त्यामुळे 80 दशलक्ष लिटर्स इतक्या दैनंदिन पाण्याची बचत होईल. ज्या भागात पूर्वी एकवेळ पाणीपुरवठा होता. त्या भागात मात्र अन्य कोणतीही कपात नसेल.

























































