
सामना प्रतिनिधी, खेड
दर्जाहीन कामामुळे पहिल्याच पावसात खचलेल्या आणि भगदाड पडलेल्या जगबुडी नदीवरील नव्या पुलाची दुरुस्ती करण्याचे काम आता कदाचित सुरू केले जाईल. प्रवाशांच्या जिवाशी खेळणारी ठेकेदार कंपनी युद्धपातळीवर पडलेली भगदाडं लिंपण्याचा प्रयत्न करेल. मात्र पहिल्याच पावसात पुलाच्या जोडरस्त्यांची झालेली अवस्था पाहता पावसाळ्यात या पुलावरून वाहने चालवणे म्हणजे मृत्युची टांगती तलवार डोक्यावर घेऊन प्रवास करण्यासारखे आहे. या घटनेने संतप्त झालेला खेडच्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन छेडल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने ठेकेदाराला जाब विचारला आहे. मात्र प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदार कंपनीला केवळ जाब विचारून चालणार नाही, तर कठोर कारवाई होणे आहे अशी मागणी करण्यात येत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला नवा पुल पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता. त्या दृष्टीने चाचणीही घेण्यात आली होती. केवळ काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी पूल वाहतूकीस खुला करण्यात आलेला नव्हता. आता प्रवाशी पुल वाहतूकीस खुला होण्यास विलंब झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानत आहेत. कारण पावसाळ्यापूर्वी नवा पूल वाहतूकीस खुला झाला असता तर काल जोडरस्त्यांना पडलेल्या भगदाडांमुळे या पुलावर महाडच्या सावित्री नदी पुलावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
शुक्रवारी सायंकाळी पुलाच्या अप्रोच रोडवर पडलेले भगदाड नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रवाशी आणि यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली होती . त्यातच शनिवारी दुपारी पुलाच्या संरक्षक भितीला तडे गेल्याचे निदर्शनास आले आणि आधीच्या संतापात आणखीनच भर पडली. संतप्त झालेले खेडवासीय शनिवारी दुपारी जगबुडी पुलाजवळ जमा झाले आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या उद्दाम ठेकेदार कंपनीच्या नावाने शिमगा करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर संतापल्या नागरिकांनी महामार्ग रोखून धरला.
महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यावर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने घटनास्थळी दाखल झाले. त्यानी संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जो पर्यंत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम महामार्ग खात्याचे अधिकारी येत नाहीत तो पर्यत महामार्ग वाहतूकीस खुला होणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यांने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. अखेर प्रांत सोनोने यानी आंदोलकांची समजूत काढल्यावर महामार्ग वाहतूकीस खुला करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी अप्रोच रोडवर पडलेल्या खड्यांमध्ये वृक्षारोपणही केले.
मुंबई गोवा महामार्गावरील जुना जगबुडी पुल ब्रिटीशांनी 1931 साली बांधला. 118.25 मीटर लांबी असलेल्या हा पुल 1937 साली वाहतुकीस खूला करण्यात आला. तिथपासून आजतागायत या पुलावरून अव्याहतपणे वाहतूक सुरू आहे. मात्र पुलाच्या ढाच्याला आजही काही झालेलं नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधलेला नव्या पुलाने पहिल्याच पावसात मान टाकल्याने ब्रिटीशांच्या काळात कामाच्या दर्जाला तर आजच्या काळात कामातून मिळणाऱ्या पैशाला किंमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.






























































