नोकरीचे आमिष दाखवून जमीन बळकावली, धनंजय मुंडेंविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhananjay-munde-ncp

सामना प्रतिनिधी । बीड

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जमिन साखर कारखान्यासाठी ताब्यात घेवून त्या बदल्यात मुलाला नोकरी देण्याचे आमिष दाखवले गेले परंतू जमिनीचा ठरल्याप्रमाणे मोबदला दिला नाही व मुलाला नौकरी ही मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकरी कुटुंबाने राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जुलैपासून सहकुटूंब धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याविरूद्ध शेतकऱ्याने आंदोलन सुरू केल्याने जिल्हाभर या आंदोलनाची चर्चा होत आहे.

शेतकरी उद्धव कचरू सावंत व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पाण्डेय यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र शुगर फॅक्टरी सुरू करायची आहे. या ठिकाणी तुमच्या मुलाला नोकरी देतो त्यासाठी तुमची जमीन कारखान्याला द्या असे प्रलोभन दाखवून माझ्याकडून जमीन लिहून घेतली. त्या जमिनीचा सौदा ठरल्या प्रमाणे पैसेही मुंडे यांनी दिले नाहीत. शिवाय माझ्या मुलाला कारखान्यात नौकरीही दिली नाही. त्यामुळे माझी फसवणूक झाली असून या प्रकरणात मी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो परंतू त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला आहे. माझ्या सारख्या गरिबांवर अन्याय होवूनही पोलीस प्रशासन दखल घेत नाही व न्याय मिळत नाही म्हणून नाईलाजास्तव मी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. असे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

farmer-protest

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी प्रलोभन दाखवून जमिन व्यवहारात फसवणूक झालेले पुस गावातील इतर शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले आहे. निवेदनावर उद्धव सावंत, संजय सावंत, शांताबाई सावंत, सुमनबाई माणिक भालेराव, लखन माणिक भालेराव, मौला काशिम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.