
सामना प्रतिनिधी, कल्याण
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना चाकरमान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब होण्याची स्थिती ओढावली. धो धो पावसामुळे पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजारात आवक निम्म्यावर घसरली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची एक जुडी 80 रुपये, मेथी 40 तर गवार, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो 100 ते 120 रुपये किलोने विकले जात होते. महागाईचा पाऊस कोसळल्यामुळे भाज्यांचे दर चक्क तिपटीने भडकले आहेत.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी 150 ट्रक, टेंपो यांच्या माध्यमातून शेतीमाल येतो. शहापूर, मुरबाड, आंबेगाव, नगर, नाशिक, लासलगाव येथून भाजी, फुले, फळे, कांदा, बटाटा यांची आवक होते. तर गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू येथून अन्नधान्याची आवक होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पालेभाज्यांचे नुकसान झाले असून आवक घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर भडकले आहेत. कोथिंबिरीची जुडी घाऊक बाजारात 80 ते 100 रुपये विकली जात आहे. तर दर वाढल्याने किरकोळ बाजारात भाजीवाल्यांकडे ग्राहकाने पाठ फिरवली आहे.
कोंबडी, अंडीही महागली
एकीकडे भाज्यांचे दर वाढत असताना मांसाहार करणाऱयांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. ब्रॉयलर कोंबडीचे दर वाढले आहेत. सध्या जिवंत ब्रॉयलर कोंबडी 140 तर गावठी कोंबडी 240 रुपये किलोने विकली जात आहे. किलोमागे 20 रुपये वाढ झाली आहे. शिवाय अंडय़ांच्या दरात नगामागे 1 रुपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात 72 रुपये डझनाचा दर आहे.
परराज्यातूनही आवक कमी
दररोज सरासरी दहा हजार क्विंटल कृषिमाल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होतो. मात्र आज अवघ्या पाच हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली. आवक घटल्याने भाज्यांचे दर तिप्पट झाले आहेत. किमान चार दिवस दर कमी होणार नाहीत, अशी माहिती भाजीपाला व्यापारी संघटनेने दिली.



























































