
सामना प्रतिनिधी । वडवणी
वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील तरूण शेतकरी मयत बाळासाहेब रामभाऊ गायकवाड (४०) या शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून दि. २ जुनच्या पहाटे पाचच्या दरम्यान लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस स्टेशनचे सपोनी खाडे व कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून मृतदेह कुप्पा येथील रूग्णालयात पी.एम साठी पाठविला.
वडवणी तालुक्याला गेल्या वर्षापासून दुष्काळाने ग्रासले असून तालुक्यात आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. खळवट लिमगाव येथील शेतकरी मयत बालासाहेब रामभाऊ गायकवाड (वय ४०) वर्ष या शेतकऱ्याने सततची नापिकी तसेच डोक्यावर कर्जाचा डोंगर व यावर्षीची पेरणी कशी करायची यासह अनेक विवंचनेतून निराश होवून घरपासून जवळच असलेल्या स्वत:च्या शेतात पहाटे पाचच्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून शेतकऱ्याच्या वडिलाच्या नावे साडेसहा एकर कोरडवाहू जमीन असून त्यांचेकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज साठ हजार आहे. तर डिसीसी बँकेचे सत्तर हजार कर्ज आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी व तीन लहान मुले आहेत. गायकवाड कुंटुबियाची परिस्थिती अत्यंत बिकट असून मुलाच्या शिक्षणासाठी शासनाच्या आर्थिक मदतेची गरज असून त्वरित मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस स्टेशनचे सपोनी सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.शिंदे व पो.कॉ.वाघमारे करत आहेत.



























































