
सामना प्रतिनिधी । धुळे
धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्लील चाळे करताना महाविद्यालयीन तरुण-तरुणीस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. प्रत्येकी 200 रुपये जास्तीचे आकारून थिएटरमध्ये एकांत मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती ‘दामिनी’ पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी या कारवाईत चार तरुण, तरुणी पथकाच्या हाती लागले. तर काहीजण पळून गेले. या प्रकरणी तरुण-तरुणींवर तसेच थिएटर चालकावर कारवाई करण्यात येईल.
लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगल्याजवळ दोन दिवसांपूर्वी काही तरुण-तरुणींना पकडून मोहाडी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. या कारवाईची समज संबंधित तरुण-तरुणींना देतानाच त्यांच्या पालकांनादेखील माहिती देण्यात आली. पण त्याचवेळी शहरातील ज्योती चित्रमंदिरात प्रत्येकी 200 रुपये आकारून सिनेमाच्या काळापुरता एकांत मिळवून देण्याची व्यवस्था केली जाते, अशी माहिती ‘दामिनी’ पथकाला मिळाली. त्यानुसार ‘दामिनी’ पथकातील तरुणी सहकाऱ्यासोबत थिएटरमध्ये गेली. बॉक्स या विभागात अनेक जोडपी त्यांना बसलेली आढळली.





























































