
सामना प्रतिनिधी । मुंबई
इंटरनेटच्या युगात सर्वात वेगवान आणि प्रभावी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेले फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्ऍप आज चक्क स्लो मोडवर गेले. दुपारपासून त्यांचा वेग मंदावल्याने फोटो अपलोड, डाऊनलोड करताना युझरला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्ऍपची मालकी एकाच कंपनीकडे आहे. आज दुपारी 2 वाजून 49 मिनिटांनी अचानक या तिन्ही सोशल मीडियांचा वेग मंदावला. याबाबत फेसबुकने अधिकृतपणे कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने सुरुवातीला युझर गोंधळले होते, मात्र स्लो मोडची समस्या सर्वानाच जाणवत असल्याने व्हॉटस्ऍप डाऊन, फेसबुक डाऊन, इन्स्टाग्राम डाऊन हा हॅशटॅग सायंकाळी टॉप टेण्डमध्ये होता. इन्स्टाग्रामचे 82 टक्के वापरकर्त्यांनी माहिती अपलोड करताना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे तर व्हॉटस्ऍप आणि फेसबुकच्या वापरकर्त्यांनी नेहमीपेक्षा मंदगतीने सिस्टम सुरू असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दरम्यान आपल्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून तिन्ही सेवा हळूहळू सुधारत असल्याचे फेसबुकने रात्री उशिरा ट्विटवर स्पष्ट केले आहे.






















































