जपानी मेंदूज्वराने दोन जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात जपानी मेंदूज्वराने 12 मृत्यू झाल्याची बातमी खोटी असून चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 2 मृत्यू झाले आहेत आणि हे रुग्ण देखील गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. दरम्यान हा ताप शौचकुपातील पाईपमध्ये असलेल्या क्युलेक्स डासापासून होतो आणि या डासापासून बचावासाठी जिल्ह्यात लसीकरण सुरु केले जाणार आहे.

सध्या देशात विविध ताप आणि आजारांनी बालकांचा मृत्यू होत आहे. त्यातच माध्यमात चंद्रपूर जिल्ह्यात जपानी ज्वरामुळे 12 मृत्यू झाले असल्याची बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य विभाग हादरून गेला होता. मात्र ही बातमी चुकीची असून जिल्ह्यात या तापामुळे केवळ 2 मृत्यू झाल्याची पुष्टी जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. जपानी तापामुळे मे आणि जून 2019 या 2 मागील महिन्यात 19 रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 7 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 5 रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील तर 2 रुग्ण गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी होते.

गडचिरोली जिल्ह्यातील 2 रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील 2 रुग्ण सध्या उपचारार्थ दाखल असले तरी 3 रुग्णांना प्रकृती सुधारल्याने सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात या तापाने 12 मृत्यू झाल्याची बातमी खोटी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, जपानी ताप हा क्युलेक्स डास चावल्याने होतो. हा डास शौचकुपातील पाईपमध्ये वास्तव्य करतो अशी माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली आहे. 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुलं-मुलींना याचा अधिक त्रास संभवतो. अचानक डोकेदुखी-उलटी आणि  अस्वस्थ होणे याची लक्षणे आहेत. आपल्या आसपासच्या परिसरात स्वच्छता राखणे, शौचकुपातील पाईपला जाळी बसविणे, सांडपाणी वाहते ठेवणे या उपाययोजना केल्यास यापासून बचाव केला जाऊ शकतो. असे डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता  , चंद्रपूर शास. वैद्य. महा. व्ही ओ यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे यंदापासून या तापाच्या लसीकरण मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून ती आगामी काळात सुरू केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा या जपानी ज्वराच्या मुकाबल्यासाठी सज्ज असून लसीकरण मोहिमेने या तापाच्या विरोधात अधिक बळ मिळणार असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.