
सामना प्रतिनिधी। मुंबई
गेल्या दोन दिवसांत झालेला पाऊस मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया तलावांतही दमदारपणे बरसला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात धरणांमध्ये 18 दिवसांचा पाणी साठा वाढला आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणांमध्ये 46 दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात मागील वर्षी परतीच्या पावसाने दडी मारली. यामुळे पाणीसाठा कमी असल्याने पालिकेला राखीव पाणीसाठा वापरावा लागत आहे. मात्र गेल्या चार दिवसात पडलेल्या पावसामुळे तलावात पाणी साठय़ात वाढ झाली आहे. पावसामुळे शुक्रवारी तलावात 71 हजार 17, शनिवारी तलावात 76 हजार 833, रविवारी सकाळी तलावात 87 हजार 648 तर सोमवारी 1 लाख 47 हजार 353 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 1 लाख 69 हजार 786 इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 46 दिवस पुरेल इतका आहे. दोन दिवसांपूर्वा धरणांमध्ये 28 दिवस इतका पाणीसाठा होता, त्यात आज 18 दिवसांची वाढ झाली आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडून मुंबईला लागणारा पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाल्यास मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणी कपात रद्द केली जाऊ शकते.
तलावातील पाणीसाठा
(दशलक्ष लिटर)
मोडकसागर 45,073
तानसा 26,224
मध्य कैतरणा 45,881
भातसा 37,265
किहार 4,796
तुळशी 10,029
एकूण 1,69,786























































