पंधरा डब्यांचा प्रकल्प पैशांअभावी रखडला! मध्य रेल्वे प्रवाशांच्या ‘यातना’ सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या लोकलची गर्दी सामावण्याची क्षमता संपली असून सध्याच्या बिझी वेळापत्रकामुळे एकही नवीन फेरी वाढविणे शक्य नसल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याच्या 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्यावाचून मध्य रेल्वेकडे गत्यंतर नसल्याचे म्हटले जात आहे. परंतु कल्याणच्या पुढे 15 डब्यांच्या लोकल चालविण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे लाल फितीत अडकला असल्याने पैसे मिळाल्याशिवाय कामच सुरू करता येत नसल्याचे उघड झाले आहे.

मध्य रेल्वेवर सध्या 1774 लोकल फेऱया दररोज चालविण्यात येतात. सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरमध्ये मध्य रेल्वेवर दर चार मिनिटांनी एक लोकल चालविण्यात येत असून वाढत्या लोकसंख्येमुळे या 1774 फेऱयाही अपुऱया पडत आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेची दररोजची प्रवासी संख्या फुगत चालली असून ती आता 43 लाखांच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ठाण्यापलीकडच्या प्रवाशांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कल्याणच्या पुढे कर्जत, कसारा आणि खोपोली अशा पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याची योजना मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविली आहे. साधारण 500 ते 900 कोटी रुपयांची त्यासाठी गरज असून रेल्वे बोर्डाने निधी मंजूर केल्याशिवाय पंधरा डब्यांचे काम सुरू करणे कठीण असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू!
कल्याण ते बदलापूर तिसऱया आणि चौथ्या मार्गाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ करणार आहे तर कल्याण ते आसनगाव चौथ्या मार्गाचे काम मध्य रेल्वे करणार आहे. कल्याण ते बदलापूर मार्गिकेच्या जमिनीसाठी नुकताच ड्रोनद्वारे सर्व्हे सुरू करण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रविशंकर खुराणा यांनी स्पष्ट केले आहे.

पाचव्या आणि सहाव्या मार्गानंतर फेऱयांत वाढ
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत असून जून 2020 पर्यंतचे टार्गेट देण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत ही लाइन पूर्ण होईल; परंतु जॉइंट कनेक्शनपासून प्रत्यक्षात मार्ग सुरू करण्याचे काम जूनपर्यंत होणार असल्याने मध्य रेल्वेच्या शंभर लोकल फेऱया वाढण्याची शक्यता आहे.