डॉ. पायल तडवीची सुसाइड नोट सापडली, मोबाईल फोनमध्ये होता चिठ्ठीचा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी म्हणजेच सुसाइड नोट आतापर्यंत सापडली नव्हती. ती चिठ्ठी तिच्या मोबाईल फोनमध्ये सापडल्याचा दावा वकिलांनी केला आहे. पायलचा तिच्या वरिष्ठ डॉक्टरांनी जातिवाचक छळ केल्याचे त्यात नमूद असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.

डॉ. पायल तडवी प्रकरणात सुसाइड नोट हा महत्त्वाचा पुरावा होता. तो अद्याप सापडला नव्हता. पायलचा मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्या मोबाईलमध्ये या सुसाईड नोट तसेच या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या हेमा आहुजा, अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहेर या तीन डॉक्टरांचे फोटो सापडले आहेत, अशी माहिती पायलच्या वकिलांनी दिली आहे.

सुसाइड नोट कुणी नष्ट केली?

सुसाइड नोटचे फोटो सापडल्याने आता ही सुसाइड नोट कुणी नष्ट केली या दिशेने तपासाची सूत्रे वळणार आहेत. त्या चौकशीसाठी तिन्ही डॉक्टरांची पोलीस कोठडीत रवानगी करण्याची मागणी पोलिसांकडून केली जाईल असे वकिलांनी सांगितले. विशेष न्यायालयाने गेल्या 24 जून रोजी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर या तिघींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाविरुद्ध तिघींनी गेल्याच आठवडय़ात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 22 मे रोजी पायल तडवी हिचा मृतदेह नायर रुग्णालयाच्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याप्रकरणी 29 मे रोजी वरील तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली.