
सामना प्रतिनिधी । लंडन
वर्ल्ड कपमधील लढतीत संथ फलंदाजी करणाऱया महेंद्रसिंग धोनीवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्याच्या मंदावलेल्या हालचाली अन् सुमार फॉर्म पाहून हा वर्ल्ड कप त्याचा शेवटचा असावा अशी चर्चा रंगू लागली आहे. युवा खेळाडू रांगेत उभे आहेत असे दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनीलाही माहीत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येण्याची जाण असलेल्या महेंद्रसिंग धोनीने पडत्या काळात ज्या बॅट कंपन्यांनी साथ दिली त्यांना ‘अनोखी’ भेट देण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपमधील गेल्या काही लढतींत तो एका डावात एकापेक्षा अधिक बॅटनी खेळताना दिसत आहे. या ब्रॅण्डस्चे तो आपल्या पद्धतीने आभार मानत आहे.
कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही
अरुण पांडे पुढे म्हणाले, ‘धोनी मोठय़ा मनाचा माणूस आहे. तो मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रॅण्डस्च्या बॅट वापरत आहे, मात्र त्यासाठी तो कोणत्याही प्रकारचे शुल्क या कंपन्यांकडून घेत नाही. आपल्या करीयरमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला साथ देणाऱया या बॅट कंपन्यांच्या ब्रॅण्डस्चे तो त्याच्या पद्धतीने आभार मानत आहे.’
मागील काही महिन्यांपासून धोनी एसएस, एसजी आणि बीएएस या बॅटस्नी खेळताना दिसतोय. जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा त्याच्याकडे वेगळ्या ब्रॅण्डची बॅट असते आणि शेवटच्या षटकांमध्ये तो वेगळ्या बॅटने फलंदाजी करताना दिसतो. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने अगदी शेवटच्या चेंडूआधी बॅट बदलली आणि शेवटच्या चेंडूवर त्याने थेट षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. धोनी सतत बॅट का बदलतो याबद्दलचा खुलासा त्याच्या व्यवस्थापकाने केला आहे. धोनी आपल्या कृतीमधून त्याच्या प्रायोजकांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत आहे. या प्रायोजकांनी सुरुवातीच्या कठीण काळात धोनीवर विश्वास दाखवला. त्यामुळेच धोनी एक यशस्वी क्रिकेटपटू होऊ शकला, असे मत धोनीचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.



























































