तिवरे धरणफुटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या भेंडवाडीचा वीजपुरवठा पूर्ववत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीमध्ये महावितरणचे तब्बल 26 वीज खांब वाहून गेले तर 2 रोहित्र पेट्यांचे मोठे नुकसान झाल्याने तिवरे येथील भेंडवाडी व फणसवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी दोन दिवस युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे हा वीजपुरवठा सुरळीत झाला.

भेंडवाडीला महावितरणच्या गाणेखडपोली येथील वीज उपकेंद्रातून 11 केव्ही तिवरे वाहिनीद्वारे वीजपुरवठा होतो. 2 जुलैच्या रात्री तिवरे धरणाला भगदाड पडून भेंडवाडी उद्ध्वस्त झाली. यामध्ये उच्चदाबाचे 4 व लघुदाबाचे 22 असे 26 वीज खांब तारांसह वाहून गेले. रोहित्र, रोहित्रपेट्या व काही वीज खांब असे एकूण साडेसात लाखांचे नुकसान झाले. खांब वाहून गेल्यामुळे भेंडवाडी व पुढे असलेल्या फणसवाडी येथील एकूण 70 ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. भेंदवाडी व फणसवाडी वगळता सर्व गावांचा वीजपुरवठा लागलीच पूर्ववत सुरु झाला.

विजेचे खांब उभे करण्यापेक्षा त्याची वाहतूक करणे आव्हानात्मक होते. कारण भेंडवाडीला जाताना नदी ओलांडावी लागत होती. रस्ता नव्हताच. त्यामुळे दहा-बाराजणांनी लोखंडी खांब खांद्यावर घेऊन वाहती नदी ओलांडत युद्धपातळीवर काम सुरू केले. दिवसभरात 7 खांब उभे करून रात्री 9.30 च्या सुमारास 43 ग्राहकांच्या वीज जोडण्या सुरू करण्यात यश आले. शुक्रवारी (दि. 5) आणखी दोन खांब उभे पोल करून 2 जोडण्या चालू करण्यात आल्या आहेत. धरणफुटीमुळे 70 वीज जोडण्या बाधीत झाल्या होत्या. यामध्ये दोन पाणीपुरवठा योजनांचाही समावेश आहे. त्यातील एक पाणीपुरवठा योजना पूर्वीपासूनच बंद होती तर एक मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती.