प्रभाग निहाय शाखाप्रमुख नियुक्तीचा पहिला मान हिंगोली विधानसभेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र अभियानांतर्गत शिवसेनेकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या या 1 लाख महिला व पुरुष प्रभागनिहाय शाखाप्रमुखांच्या नियुक्तीचा पहिला मान हिंगोली विधानसभेने पटकाविला आहे. विधानसभा क्षेत्रातील 179 गावांमध्ये वार्डनिहाय शाखाप्रमुख व शाखा संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना या वार्डनिहाय शाखाप्रमुख नियुक्तीचा अहवाल हिंगोली लोकसभेचे शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी सुपूर्द केला आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रात शाखाप्रमुख व शाखा संघटक नियुक्त करुन छायाचित्रासह व मोबाईल क्रमांकासह अहवाल दिल्याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंगोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे कौतुक केल्याची माहिती संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी दिली.

’माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत गाव पातळीवर असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वार्डनिहाय पुरुष शाखाप्रमुख व महिला शाखा संघटक नियुक्त करण्याचे अभियान शिवसेनेने सर्व जिल्ह्यामध्ये हाती घेतले आहे. या माध्यमातुन राज्यभरात एक लाख शिवसैनिकांची फौज भगवा फडकविण्यासाठी सज्ज होणार आहे. हिंगोली विधानसभा क्षेत्रात हिंगोली तालुक्यातील 72 तर सेनगाव तालुक्यातील 107 गावांचा समावेश आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात वार्डनिहाय शाखाप्रमुख नियुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हिंगोली लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी हिंगोली विधानसभा क्षेत्रातील दोन्ही तालुक्यात दौरा करुन वार्डनिहाय पदाधिकारी नियुक्तीच्या अभियानाला गती दिली.

डॉ. रमेश शिंदे यांच्यासह विधानसभा संपर्वâप्रमुख आशीष गुलवाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, कडुजी भंवर व सर्व सर्वदलप्रमुखांनी हिंगोली विधानसभा क्षेत्रात वार्डनिहाय नियुक्त केलेल्या शाखाप्रमुखांचे छायाचित्र व मोबाईल क्रमांक अर्जासह भरुन जिल्हा परिषद गटनिहाय अहवाल तयार केला. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना हिंगोली विधानसभेचा हा अहवाल लोकसभा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव व विधानसभा संपर्क प्रमुख आशीष गुलवाडे यांनी सुपूर्द केला. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मराठवाडा समन्वयक तथा उपनेते विश्वनाथ नेरुरकर, महसुल राज्यमंत्री संजय राठोड आदींची उपस्थिती होती. हिंगोली विधानसभेच्या अहवालाचे अवलोकन करुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कौतुक केल्याचे आनंदराव जाधव यांनी सांगितले.